क्रिकेट हा भारतात धर्म समजला जात असला आणि खेडोपाडी या खेळाची लोकप्रियता झाली असली तरीही महिलांनी या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी फारशी संधी नाही असेच सांगितले जात असते. अतिशय प्रतिकूल वातावरणात व खूप संघर्ष करीत झुलन गोस्वामीने महिला क्रिकेटमध्येही करिअर करता येते हे दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जगात सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. भारतीयांसाठी खरोखरीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
झुलन हिने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिलांच्या चौरंगी एकदिवसीय स्पर्धेत आफ्रिकेच्या रायसिबी नितोझाखे हिला बाद केले आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८१वा बळी नोंदविला. हा बळी घेत तिने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कॅथरिन फिट्झपॅट्रिक हिचा १८० बळींचा विक्रम मोडला. जवळजवळ दहा वर्षे हा विक्रम मोडला गेला नव्हता. फिट्झपॅट्रिक हिने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर झुलन हीच जगातील सर्वात वेगवान गोलंदाज समजली जाते.
झुलन ही क्रिकेटमध्ये आली नसती तर कदाचित फुटबॉलमध्ये तिने करिअर केले असते. पश्चिम बंगालमधील चकदाहा या नदियाजवळील खेडेगावात जन्मलेल्या झुलन हिला लहानपणापासून फुटबॉलची आवड होती, मात्र गावातील अन्य मुले टेनिस चेंडूने क्रिकेट खेळताना तिला आपणही क्रिकेट खेळावे अशी इच्छा निर्माण झाली. १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक सामन्याच्या थेट प्रक्षेपणामुळे तिची क्रिकेटची आवड आणखी वाढत गेली. १९९७ मध्ये कोलकाता येथे महिलांच्या विश्वविजेतेपदासाठी झालेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील लढतीमधील खेळाडूंचा जोश पाहून क्रिकेट हा खेळ तिच्या मनावर खोलवर रुतत गेला. तिने क्रिकेट खेळू नये अशीच तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे सुरुवातीला क्रिकेट खेळण्यासाठी तिला अनेक वेळा पालकांबरोबर भांडावे लागले. तिच्याकडे क्रिकेटसाठी उत्तम नैपुण्य आहे हे तिचे प्रशिक्षक स्वपन साधू यांनी ओळखले होते. त्यांनी झुलनच्या पालकांची समजूत काढली. नाइलाजास्तव तिच्या पालकांनी तिला क्रिकेटसाठी परवानगी दिली.
क्रिकेटसाठी परवानगी मिळाली खरी, पण त्यासाठी कोलकाता येथे जाणे अपरिहार्य होते. तिच्या आईवडिलांची आर्थिक स्थिती मध्यम स्वरूपाची असल्यामुळे कोलकाता येथे निवास करणे अशक्य होते. तथापि, झुलन ही कमालीची जिद्दी खेळाडू आहे. तिच्या गावापासून कोलकाता हे ८० किलोमीटर अंतरावर आहे. दररोज पहाटे साडेचारला रेल्वेप्रवास व नंतर बसचा प्रवास अशी दरमजल करीत ती कोलकाता येथे सरावासाठी येत असे. पाच फूट ११ इंच उंची लाभलेल्या झुलन हिने आपल्या उंचीचा अतिशय समर्पक उपयोग करून घेतला आहे. शेवटच्या फळीतील उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून तिने नावलौकिक मिळविला आहे. दहा कसोटी सामन्यांमध्ये २८३ धावा करताना तिने दोन वेळा अर्धशतके टोलविली आहेत. कसोटीत तिने ४० गडी बाद करताना तीन वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने १८१ बळी घेतानाच ९०१ धावा करीत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. या सामन्यांमध्ये तिने दोन वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया केली आहे. ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही तिने एकदा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तिने या स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये ४५ बळी मिळविले आहेत.
तिने आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडमध्ये भारतास मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. २००६ मध्ये झालेल्या या मालिकेतील एकाच सामन्यात तिने पहिल्या डावात पाच व दुसऱ्या डावात पाच असे दहा बळी घेतले आहेत. २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार देऊन तिला सन्मानित केले होते. हा पुरस्कार तिने महेंद्रसिंग धोनी याच्या हस्ते स्वीकारल्यानंतर जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, अशी तिने प्रतिक्रिया दिली होती. वेगवान गोलंदाजीबरोबरच अचूक दिशा व टप्पा ओळखून चेंडू टाकण्यावर तिचा कटाक्ष असतो. बळी घेण्याबरोबरच धावा रोखण्याचीही कामगिरी गोलंदाजाने करावयाची असते असे तिचे ठाम मत आहे.
आपल्या देशास विश्वचषक जिंकून देण्याचे तिचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. सदोदित हसतमुख खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या या खेळाडूने सतत अन्य महान खेळाडूंच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करण्यावर व त्यानुसार आपल्या खेळात सुधारणा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच ती भारतीय संघाचा मोठा आधारस्तंभ मानली जाते.
मिलिंद ढमढेरे
milind.dhamdhere@expressindia.com