Rohit Sharma’s Insta Story Viral : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा समावेश असलेला संघ इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. या मालिकेत टीम इंडियाकडे २-१ अशी आघाडी आहे. मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ४३४ धावांनी विजय मिळवला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधार रोहित शर्माची पोस्ट व्हायरल –

कर्णधार रोहित शर्माने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रोहित शर्माने यशस्वी जैस्वाल, सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांचा फोटो शेअर केला असून या फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, ‘ही आजकालची मुलं.’ खरंतर, रोहित शर्माने या तिन्ही खेळाडूंचे कौतुक करताना हा फोटो शेअर केला आहे. या तिन्ही खेळाडूंनी राजकोट कसोटीत चमकदार कामगिरी केली होती.

यशस्वी जैस्वालने झळकावले द्विशतक –

या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले होते. या डावात यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूत नाबाद २१४ धावा केल्या. यादरम्यान यशस्वी जैस्वालने १४ चौकार आणि १२ षटकार मारले. यासह त्याने कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी १९९६ मध्ये वसीम अक्रमने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी डावात १२ षटकार मारले होते.

हेही वाचा – IND vs ENG : ‘५०० ते ५०१ विकेट्स दरम्यान आमच्या आयुष्यात…’ अश्विनच्या कामगिरीबद्दल पत्नी प्रीतीची भावनिक पोस्ट

सर्फराझ खानने दोन्ही डावात झळकावली अर्धशतके –

सर्फराझ खानचा हा पहिलाच कसोटी सामना होता. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली. सर्फराझ खानने दोन्ही डावात ५०हून अधिक धावा केल्या. त्याने पहिल्या डावात ६२ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ६८ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. सर्फराझ खानसाठी हा विक्रम ठरला. याआधी भारतासाठी केवळ तीनच फलंदाज होते ज्यांनी पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ५०हून अधिक केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : जसप्रीत बुमराह रांची कसोटीचा भाग असणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण?

ध्रुव जुरेलनेही सोडली आपली छाप –

सर्फराझ खानसह ध्रुव जुरेलचा हा पदार्पणाचा सामना होता. आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच डावात त्याने १०४ चेंडूंचा सामना केला आणि ४६ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने विकेटकीपिंगमध्येही चाहत्यांची मने जिंकली. त्याने मोहम्मद सिराजने फेकलेल्या थ्रोवर बेन डकेटला अतिशय चपळाईने रनआऊट केले होते. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insta story of rohit sharma praising dhruv jurel yashasvi jaiswal and sarfaraz khan went viral vbm