Sunil Chettri’s wife pregnant: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री लवकरच बाप होणार आहे. सामन्यादरम्यान एका अनोख्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून छेत्रीने ही माहिती दिली. छेत्रीच्या गोलच्या जोरावर भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात वानुआतूचा १-० असा पराभव केला आणि अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले पण जागतिक क्रमवारीत १६४व्या क्रमांकावर असलेल्या वानुआटूच्या बचावात्मक खेळीमुळे त्यांना बराच वेळ आघाडी घेण्यापासून रोखले. स्टार स्ट्रायकर छेत्रीने सामन्याच्या ८१व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय निश्चित केला.
सुनील छेत्रीने गोल केल्यानंतर चेंडू टी- शर्टच्या आत लपवला. यानंतर त्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित पत्नी सोनम भट्टाचार्यकडे पाहून अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. छेत्रीने सोनमला फ्लाइंग किस दिला आणि पत्नीनेही उठून पतीला प्रोत्साहन दित फ्लाइंग किस दिला. सोनम बेबी बंपसोबत दिसली. या सेलिब्रेशनच्या माध्यमातून छेत्रीला त्याच्या चाहत्यांना सांगायचे होते की तो लवकरच पिता होणार आहे.
‘बायकोची इच्छा होती की मी अशा प्रकारे मुलाबद्दल माहिती द्यावी’- सुनील छेत्री
सामन्यानंतर सुनील छेत्री म्हणाला, “मी आणि माझी पत्नी लवकरच आई-वडील होणार आहोत आणि आम्ही आमच्या बाळासाठी खूप स्वप्न रंगवली आहेत. मी आमच्या बाळाच्या आगमनाची याप्रकारे घोषणा करावी अशी तिची इच्छा होती. आम्हाला चाहत्यांकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतील अशी आशा आहे.” छेत्रीने जर्सीच्या आत चेंडू लपवून सर्वांना ही खुशखबर दिली, फुटबॉलच्या जगात फुटबॉलपटूंनी अशाप्रकारे प्रेग्नसीबद्दल माहिती देणे सामान्य आहे, कारण याआधीही अनेक फुटबॉल सामन्यात असे घडले आहे.
सुनील छेत्रीने ८६वा आंतरराष्ट्रीय गोल केला
जागतिक क्रमवारीत १०१व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय फुटबॉल संघाने पहिल्या सामन्यात मंगोलियाचा पराभव केला. संघाचे २ सामन्यांत ६ गुण झाले आहेत. वानूचा हा दोन सामन्यांतील दुसरा पराभव आहे. भारतीय संघाला आपला पुढचा सामना लेबनॉनसोबत राऊंड रॉबिन टप्प्यात खेळायचा आहे. सक्रिय फुटबॉलपटूंच्या यादीत सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीनंतर छेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. छेत्रीने ८६ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.
चार देशांच्या राउंड-रॉबिन स्पर्धेत लेबनॉनचे दोन सामन्यांतून तीन गुण आहेत. पहिल्या सामन्यात लेबनॉनने वानुआतूचा ३-१ असा पराभव केला. मंगोलियन बचावपटू एम.गॉलनबॅटने चांगली भूमिका बजावली आणि लेबनीज आक्रमणे रोखून धरली. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. तळाच्या मंगोलियन फुटबॉल संघाने सोमवारी येथे विजेतेपदाच्या दावेदार लेबनॉनला गोलशून्य बरोबरीत रोखून कॉन्टिनेंटल चषकात पहिला गुण मिळवला. मंगोलियाने पहिला सामना भारताविरुद्ध गमावला होता. आता ड्रॉ झालेल्या सामन्यातून एका गुणासह त्यांनी गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे.