आठवडय़ाची मुलाखत : पारुपल्ली कश्यप, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

पारुपल्ली कश्यप. भारताचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू. सध्या सुरू असलेल्या बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये कश्यपच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण आगामी स्पर्धासाठी तो गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये सराव करत आहे. बॅडमिंटन लीगमधील कामगिरी, लीगला मिळणारा प्रतिसाद, गेल्या वर्षीच्या दुखापतींतून तंदुरुस्त झाल्यावर आता आगामी ध्येय, आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक आणि नवीन सव्‍‌र्हिसचा बदललेला नियम, याबाबत कश्यपने बातचीत केली.

* यंदाच्या बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये तुमच्या संघाची चांगली कामगिरी झाली नाही, त्याबद्दल काय सांगशील?

आमचा संघ तगडा होता, पण संघातील काही खेळाडू तंदुरुस्त नव्हते, तर काहींचा फॉर्म चांगला नव्हता. श्रीकांत पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे त्याने सरावही जास्त केला नाही. आम्ही दहा सामने खेळलो, पण आम्हाला एकही गुण कमावता आला नाही. ही फारच निराशाजनक कामगिरी आहे.

* यंदाची लीग जास्त काळ सुरू असल्याचा किती परिणाम झाला?

यंदाच्या लीगला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मी काही यामधला तज्ज्ञ नाही, पण देशातील लोक मोठय़ा प्रमाणात बॅडमिंटन खेळतात. या लीगमध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत, पण तरीही हवी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही. सारे जण यासाठी प्रयत्न करत आहेत. चाहत्यांना खेळात कसे सामील करता येईल, हे पाहायला हवे. ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते, त्या शहरांमध्ये सामने खेळवले गेले नाहीत. हैदराबाचे लोक सिनेमाप्रेमी आहेत. त्यामुळे काही कलाकारांना आमंत्रित केले, तर गर्दी होऊ शकते.

* तू दुखापतीतून सावरला आहेस, आता पुढे काय ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहेस?

गेले वर्ष माझ्यासाठी चांगले गेले नाही. कारण मी जायबंदी होतो. पण आता तंदुरुस्त झाल्यावर काही ध्येये मी डोळ्यापुढे ठेवली आहेत. मला सुपरसीरिज, विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायच्या आहेत. काही वेळा मी तंदुरुस्त होतो, तर स्पर्धा नव्हत्या. स्पर्धा असताना मी जायबंदी असायचो. काही सामन्यांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त नसताना खेळलो आणि अपेक्षित कामगिरी मला करता आली नाही. पण पीबीएल हा माझ्यासाठी चांगला सराव होता. आता मलेशिया आणि इंडोनेशियाला स्पर्धा आहेत, त्यानंतर ऑल इंग्लंड स्पर्धा आहे. या स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाच्या असतील. दुखापत झाली नसती तर मी सुपरसीरिज नक्कीचजिंकलो असतो. कारण मला दुखापत झाली तेव्हा मी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर होतो. पण आता या गोष्टींवर विचार करून काहीच फायदा नाही.

* या दुखापतीतून मानसीकरीत्या बाहेर कसा आलास?

मला फक्त जिंकायचे आहे, हाच विचार मी करत असतो. काही वेळा मी तंदुरुस्त होतो, तर स्पर्धा नव्हत्या. स्पर्धा असताना मी जायबंदी असायचो. पण गेल्या दोन महिन्यांमध्ये मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. काही खेळाडू माझ्यापेक्षा वयाने जास्त आहेत. त्यामुळे माझ्याकडे अजून काही वर्षे आहेत. आता ऑलिम्पिक पदक पटकावण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.

* आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचा कालावधी जास्त असल्याचे वाटते का?

ज्या मोठय़ा ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत, त्यांचा कालावधी कमी करायला हवा. या स्पर्धा जर दोन आठवडय़ांमध्ये खेळवल्या तर त्याचा फायदा होईल. विश्व अजिंक्यपद स्पर्धेसारखे अव्वल ६४ खेळाडूंना खेळवले गेले, तर त्याचा फायदा नक्कीच होईल. काही स्पर्धाच्या पात्रता फेरीचे नियोजन ढिसाळ असते. मी एका स्पर्धेत पहिला सामना सकाळी ११ वाजता, तर दुसरा दुपारी एक वाजता खेळलो आहे. या गोष्टींचा, खेळाडूंचा विचार करायला हवा.

* सव्‍‌र्हिसबाबत नियमांमध्ये जे बदल करण्यात आले त्याबद्दल काय सांगशील?

नवीन नियम माहीत असले तरी त्यांचा सराव आम्ही अजूनपर्यंत केलेला नाही. मलेशिया आणि इंडोनेशिया या स्पर्धामध्ये हा नवीन नियम नसेल. त्यानंतर प्रशिक्षक गोपीचंद आमच्याकडून त्या गोष्टीचा सराव करून घेतील. कोणत्याही खेळाडूला आपल्या उंचीचा फायदा मिळू नये, यासाठी हा नियम केला असावा. एकेरीमध्ये याचा जास्त फरक पडणार नाही. पण दुहेरीमध्ये अधिक फरक पडू शकतो.

Story img Loader