‘‘सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांनी ऑलिम्पिक पदकांसह बॅडमिंटनमध्ये समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. ही परंपरा पुढे राखण्याचा माझा प्रयत्न आहे व त्यासाठी कठोर मेहनत करण्याचीही तयारी आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वेने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पुण्याच्या पूर्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ गट स्पर्धामध्ये लागोपाठ दोन विजेतीपदे मिळवीत सनसनाटी कामगिरी केली. तिने इस्रायल व इटलीमध्ये झालेल्या स्पर्धामध्ये अनेक मानांकित खेळाडूंवर मात केली. या विजेतेपदांमुळे कनिष्ठ गटात पहिल्या ४० स्पर्धकांमध्ये तिला स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद असल्यामुळे विशेष आनंद झाला आहे. यापूर्वी सिंगापूर येथे २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मी मजल मारली होती. गेली दोन वर्षे विजेतेपद मिळविण्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर हे स्वप्न साकार झाल्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे पूर्वा हिने सांगितले.
ऑलिम्पिकपटू निखिल कानेटकर यांच्या अकादमीत सराव करणारी पूर्वा म्हणाली, ‘‘इस्रायल व इटलीमधील स्पर्धाच्या वेळी कानेटकर हे माझ्याबरोबर असल्यामुळे मनावर कोणतेच दडपण नव्हते. सर्वच सामन्यांमध्ये सफाईदार विजय मिळाल्यामुळे कामगिरीबाबत मी खूप समाधानी आहे. या स्पर्धामध्ये चीन, इंडोनेशिया व थायलंड आदी देशांचे स्पर्धक नव्हते, तरीही विजेतेपद मिळविणे सोपी गोष्ट नव्हती. प्रत्येक सामन्याप्रमाणे व्यूहरचना करीत व नियोजन करीत मी खेळले. बॅडमिंटनमध्ये चीनचे प्राबल्य असले तरीही त्यांच्यावर भारतीय खेळाडू मात करू शकतात हे सायना व सिंधू यांनी दाखवून दिले आहे. २०१८ मध्ये युवा ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप बराच कालावधी असला तरीही जागतिक क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’
पूर्वाचे वडील सुदीप हे आंतरराष्ट्रीय पंच आहेत, तर आई दीपा बॅडमिंटन संघटक असल्यामुळे तिला खेळासाठी सतत प्रोत्साहन मिळाले आहे. ‘‘सायना व सिंधू यांच्या ऑलिम्पिक पदकांमुळे बॅडमिंटनमधील खेळाडूंची व प्रायोजकांची संख्या वाढली आहे. स्पर्धाची संख्याही वाढत आहे. अर्थात, ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी प्रायोजकांची संख्या वाढली पाहिजे, असेही तिने सांगितले.