भारतीय हौशी बॉक्सिंग असोसिएशनला तात्पुरती मान्यता देण्याच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) निर्णयाबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे आयओएने म्हटले आहे.
आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले की, ‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमानुसार एआयबीएने आमच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. या संदर्भात आम्हाला अद्याप काहीही कळविण्यात आलेले नाही. मी किंवा आमचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. वृत्तपत्रात या संदर्भात वृत्त आल्यानंतरच आम्हाला हा निर्णय समजला.’’
‘‘कोणत्याही खेळाच्या राष्ट्रीय संघटनेला आयओएची मान्यता असायला लागते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी संबंधित खेळाडूला आयओएची परवानगी मिळणेही अनिवार्य असते. असे असूनही एआयबीएने परस्पर बॉक्सिंग संघटनेला मान्यता देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या संदर्भात आयओएच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे,’’ असेही मेहता यांनी सांगितले.
‘‘बॉक्सिंगचा देशातील कारभार सांभाळण्यासाठी आयओएने अस्थायी समिती स्थापन केली आहे. एआयबीएने मान्यता दिलेली ‘बॉक्सिंग इंडिया’ ही संस्था कोठे आहे, त्याचे पदाधिकारी कोण आहेत, याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही,’’ असे मेहता म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या निर्णयाबाबत आयओएला आश्चर्य
भारतीय हौशी बॉक्सिंग असोसिएशनला तात्पुरती मान्यता देण्याच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) निर्णयाबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आश्चर्य व्यक्त केले आहे.
First published on: 18-05-2014 at 04:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International boxing federation recognises boxing india