ICC Suspended the membership of the Sri Lanka Cricket Board: एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आयसीसी सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली आणि निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे गंभीर उल्लंघन करत आहे. तथापि, निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल. याबाबत आयसीसीने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणण्यानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेप खूप होता आणि त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेचा संघ शेवटचा साखळी खेळला गेल्याच्या एका दिवसानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे निलंबन झाले. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती आणि या संघाने ९ पैकी केवळ २ सामने जिंकले होते. त्याचबरोबर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयसीसीने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “आयसीसी बोर्डाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे गंभीर उल्लंघन करत आहे. विशेषत: त्यांचे व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनात कोणताही सरकारी हस्तक्षेप नाही, याची याची खात्री करणे आवश्यक आहे. निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी निश्चित करतील.”
दर तीन महिन्यांनी होणारी आयसीसीची बैठक १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अहमदाबाद येथे होणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकन क्रिकेटच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयसीसीने शुक्रवारी ऑनलाइन बैठक घेतली. असे कळते की आयसीसी बोर्डाला एसएलसीमधील प्रशासनापासून ते वित्त आणि अगदी राष्ट्रीय संघाशी संबंधित बाबींमध्ये श्रीलंका सरकारच्या हस्तक्षेपाची चिंता होती. आयसीसीने एसएलसीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांना सांगितले आहे की २१ नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा – SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून विजय, रॅसी व्हॅन डर डुसेनने झळकावले नाबाद अर्धशतक
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंका क्रिकेट मंडळातील अडचणींना सुरुवात झाली, जेव्हा संघ भारताकडून ३०२ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात श्रीलंका संघ केवळ ५५ धावांवर बाद झाला. भारताविरुद्धच्या या पराभवानंतर लगेचच क्रीडामंत्र्यांनी संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त केले. मात्र, त्यानंतर लगेचच श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अपीलानंतर न्यायालयाने ते पुन्हा बहाल केले.