भारतीय हॉकी महासंघास (आयएचएफ) मान्यता दिल्याच्या वृत्ताचे खंडन करीत हॉकी इंडिया हीच भारताची मान्यताप्राप्त संघटना असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) म्हटले आहे.
एफआयएचने हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आयएचएफला मान्यता दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे. भारतामधील हॉकीवर नियंत्रण करण्याचे सर्वाधिकार हॉकी इंडियास देण्यात आले आहेत. हॉकी इंडिया हीच आमच्या संघटनेशी संलग्न संघटना आहे. २००० पासून आयएचएफ ही आमच्याशी संलग्न संघटना नाही.
गतवर्षीपासून भारत हा देश म्हणून एफआयएचशी संलग्न असल्याचा दावा करण्यात आला असून आपणच खरे प्रतिनिधी असल्याचा दावा आयएचएफकडून करण्यात येत आहे. एफआयएचनेही आयएचएफला त्यांच्या दाव्यास पुष्टी देणारा पुरावा देण्यास सांगितले होते. भारतीय ऑलिम्पिक महासंघाची (आयओए) त्यासाठी मान्यता असणे अनिवार्य होते मात्र ते सिद्ध करण्यास आयएचएफला अपयश आल्यामुळेच हॉकी इंडिया हीच अधिकृत संघटना असल्याचे एफआयएचने कळविले आहे. दरम्यान आयओए पक्षपाती वागत असल्याचे सांगत आयएचएफने न्यायालयाकडे धाव घेतली आहे. त्याची सुनावणी मार्च २०१३ मध्ये होणार  आहे.

Story img Loader