ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल आदी क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या पुरस्कारासाठी नव्याने नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
ही नियमावली यंदापासून अमलात येणार आहे. ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक मिळविणारे खेळाडू राजीव गांधी खेलरत्न किंवा अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरतील. कोणते पदक मिळविले आहे, यावर हा पुरस्कार अवलंबून राहील. ऑलिम्पिकखालोखाल विश्व अजिंक्यपद स्पर्धा (चार वर्षांनी एकदा होणाऱ्या), आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असा प्राधान्य क्रम राहील. खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच त्याचे नेतृत्व कौशल्य, सांघिक कौशल्य, खेळाचा दर्जा, शिस्तबद्ध वर्तन आदींचाही विचार हा पुरस्कार देताना केला जाणार आहे. शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या पुरुष व महिला खेळांडूंना अर्जुन पुरस्कार देताना प्राधान्य दिले जाणार आहे.
क्रिकेट व देशी खेळांबाबत निवड समिती एका वेळी जास्तीत जास्त दोनच नावांची शिफारस करेल. खेळाडूच्या कामगिरीबरोबरच त्याचे नेतृत्व कौशल्य, सांघिक कौशल्य, खेळाचा दर्जा, शिस्तबद्ध वर्तन आदीचाही विचार हा पुरस्कार देताना केला जाणार आहे.
एका खेळासाठी प्रतिवर्षी एकच पुरस्कार दिला जाणार आहे. मात्र सांघिक खेळासाठी हा नियम शिथिल राहील. सहसा एका वर्षी जास्तीत जास्त पंधरा खेळाडूंनाच अर्जुन पुरस्कार दिला जातो. मात्र एखाद्या वर्षी ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल आदी महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धां असतील तर या संख्येत वाढ करण्याचा अधिकार निवड समितीला देण्यात आला आहे. एका खेळासाठी एका वेळी दोन पुरुष व दोन महिला अशा जास्तीत जास्त चार खेळाडूंची शिफारस केली जाईल.

Story img Loader