दोन वेळा ऑल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी डेन्मार्कची टिने बाऊन तसेच इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू सोनी ड्वी कुंकोरो यांच्यासह अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू २४ जून ते ११ जुलैदरम्यान रंगणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सहभागी होणार आहेत.
पुढील महिन्याअखेरीस होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात कुंकोरो याच्यावर ५० हजार अमेरिकन डॉलर इतकी आधारभूत किंमत लावण्यात येणार आहे. त्याला जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असणारा इंडोनेशियाचा सिमोन सान्तासो तसेच इंडोनेशिया आणि जर्मनीचा मार्क वेईबलर आणि डेन्मार्कचा जान ओ जॉर्गेन्सन यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावणारा जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू मॅथियास बो आणि डेन्मार्कचा कार्टसन मोगेन्सन यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकावरील व्हिएतनामचा टियेन मिन्ह नूयेन, २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता ली याँग डी हेसुद्धा जगातिक सर्वाधिक रकमेच्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये खेळणार आहेत. महिलांमध्ये, टिने बाऊनसह जर्मनीची ज्युलियन श्चेन्क, तैपेईची ताय झू यिंग या अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत. ‘‘या स्पर्धेमुळे बॅडमिंटन खेळाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळण्यास मदत होईल. चाहत्यांनाही एकाच व्यासपीठावर दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी लाभेल. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने हा चांगला उपक्रम आखला असून त्याद्वारे चाहत्यांना या खेळाकडे जवळ आणता येईल,’’ असे २०व्या वर्षी २००४ अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सोनी कुंकोरोने सांगितले.
भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दास गुप्ता म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होईल. अशा प्रकारच्या मोठय़ा स्पर्धासाठी अव्वल खेळाडूंचा सहभाग महत्त्वाचा असतो. आता आम्ही चाहत्यांनाही चांगल्या खेळाचे आश्वासन देऊ शकतो. आणखी दिग्गज खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेला लाभेल, अशी आशा आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा