इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर होणार असलेल्या बहुचर्चित आंतरराष्ट्रीय टेनिस लीगचा पहिला टप्पा मनिला, फिलीपाइन्समध्ये होणार आहे. भारताचा आघाडीचा टेनिसपटू महेश भूपती संयोजक असलेली इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग यावर्षअखेरीस होणार असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत.   
‘जागतिक स्वरूपाचे टेनिस नव्या प्रेक्षकांसमोर सादर करणे हा आयपीटीएलचा उद्देश आहे. मनिलामध्ये लीगचा पहिला टप्पा होणार असल्याची घोषणा करताना मनापासून आनंद होत आहे’, असे महेश भूपतीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी आम्ही बँकॉकची निवड केली होती. मात्र अस्थिर राजकीय वातावरणामुळे आम्हाला पर्यायी शहराचा विचार करावा लागला. जागतिक दर्जाचे इन्डोअर स्टेडियमच्या उपलब्धतेमुळे मनिलाला प्राधान्य मिळाले. मनिलामधील स्टेडियमची २०,००० अधिक प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे. गेल्या २० वर्षांत मनिलामध्ये व्यावसायिक दर्जाची टेनिस स्पर्धा झालेली नाही. शहरातील स्टेडियम्सची मी पाहणी करत असून, लवकरच स्पर्धा होणार असलेल्या स्टेडियमबाबत तपशील जाहीर केला जाईल.’
मनिलाच्या संघात अँडी मरे, जो विलफ्रेड त्सोंगा, कालरेस मोया, व्हिक्टोरिया अझारेन्का, डॅनियल नेस्टर यांचा समावेश आहे. सिंगापूर लायन्स, इंडियन एसेस आणि यूएई फाल्कन्स हे स्पर्धेतील अन्य संघ असणार आहेत. जागतिक स्वरूपाचे टेनिस आणि नॅशनल बास्केटबॉल लीगप्रमाणे मनोरंजन असे मिश्रण असलेली स्पर्धा मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल असे भूपतीने सांगितले.
नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल, सेरेना विलियम्स, व्हिक्टोरिया अझारेन्का यांच्याबरोबरच आंद्रे आगासी, पीट सॅम्प्रस, गोरान इव्हानसेव्हिक असे दिग्गज खेळाडू लीगमध्ये खेळणार आहेत. मनिला, सिंगापूर, मुंबई आणि दुबई अशा चार शहरांत लीगचे एकूण २४ लढती होणार आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी आणि लिजंड्स दुहेरी अशा पाच प्रकारांत सामने होणार आहे.