भारताला कुस्तीमध्ये गतवैभव मिळवून दिले ते सुशील कुमारने. बीजिंगपाठोपाठ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने पदक जिंकण्याची किमया साधली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्या या यशस्वी प्रवासाबरोबरच सरकारी सुविधा, कुस्तीच्या नियमांमधील बदल, आगामी लक्ष्य याबाबत केलेली खास बातचीत-
*यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तू सुवर्णपदक पटकावले, यासाठी काही खास तयारी केली होती का?
राष्ट्रकुलसाठी २-३ महिन्यांपूर्वीपासून मी तयारीला लागलो होतो. या स्पर्धेसाठी आम्ही खास रणनीती आखली होती. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या खेळाडूचे आव्हान होते. काहीही करून त्याला पराभूत करायचे आणि सुवर्णपदकाला गवसणी घालायचे मी ठरवले होते. त्यानुसार त्याच्या खेळाचा अभ्यास मी केला होता आणि रणनीतीची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे सुवर्णपदक पटकावू शकलो.
*काही महिन्यांपूर्वी कुस्तीच्या नियमांमध्ये काही बदल झाले आहेत, त्याबद्दल काय सांगशील?
नवीन नियम समजावून घेऊन ते आम्ही आत्मसात केले आहेत. हे नियम सर्वासाठी सारखेच असतात आणि त्याचे पालन करावेच लागते. या नियमांचे पालन करत अव्वल खेळ करण्याकडे माझा कल आहे.
*ऑलिम्पिकनंतर तुला दुखापत झाली होती, त्या दुखापतींतून सावरण्यासाठी तू काही स्पर्धामधून माघार घेतली होतीस. आता दुखापतीतून तू पूर्णपणे सावरला आहेस का?
ऑलिम्पिकनंतर मला दुखापत झाली होती आणि ती गंभीर स्वरूपाची होती. त्यामुळे या दुखापतीतून सावरण्यासाठी मला जास्त कालावधी लागला आणि त्यामुळेच मी काही स्पर्धामधून माघार घेतली; पण या दुखापतीतून मी पूर्णपणे तंदुरुस्त झालेलो नाही. अजूनही दुखापतीचा काही अंशी परिणाम होत असला तरी काही ठरावीक स्पर्धासाठी मी तयारी करतो आणि त्यामध्ये अजिंक्यपद पटकावण्याचा प्रयत्न करतो.
*तुम्हाला मिळणाऱ्या सोयीसुविधांबद्दल काय सांगशील?
ऑलिम्पिकच्या वेळी आमच्याबरोबर डॉक्टर नव्हते; पण त्यानंतर या परिस्थितीमध्ये मोठा सकारात्मक बदल झाला आहे. आता कुस्ती महासंघ आमच्यासाठी जी मागणी करते ते सरकार आम्हाला पुरवत आहे. जशा सुविधा वाढतात, तशी पदकांची संख्याही वाढत जाते आणि यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये याचा परिणाम दिसून आला. ज्या खेळांमध्ये आपल्याला अपेक्षा नव्हती त्या खेळांमध्येही आपण पदके पटकावली. या सुविधांमुळे कुस्तीचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्याचबरोबर या सुविधांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला आता सुगीचे दिवस येतील, असा मला विश्वास आहे.
*क्रिकेट वगळता अन्य खेळांचा विचार केला तर तू एक राजदूत म्हणून पुढे येत आहे, याबद्दल काय वाटते?
यामागे फक्त माझी नाही तर साऱ्यांची मेहनत आहे. कुस्तीचा सध्याचा चमू पाहिला तर त्यामध्ये याचे उत्तर मिळू शकेल. सध्या कुस्तीमध्ये खेळाडूंबरोबरच चांगले प्रशासक आणि चांगले प्रशिक्षक आम्हाला लाभले आहेत आणि त्यामुळेच कुस्तीचा विकास होताना दिसत आहे. चमू चांगला असेल तर सर्व काही चांगले होते. सध्या येणारा काळ कुस्तीसाठी चांगला असेल. तुम्ही मला विचाराल तर सचिन तेंडुलकर हा खेळाचा राजदूत आहे. तो एका कार्यक्रमामध्ये आम्हाला भेटला होता. त्याच्याकडून नेहमीच आम्हाला प्रेरणा मिळते.
*आता यापुढचे ध्येय काय असेल?
गेले दोन ऑलिम्पिक आणि आताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशामुळे जबाबदारी अजून वाढलेली आहे. सध्याच्या घडीला रिओ ऑलिम्पक हे माझे लक्ष्य असेल आणि त्याच्याच तयारीला मी लागलो आहे. देशाची अधिकाधिक सेवा आणि देशवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा