कोणत्याही खेळाडूला नमवण्याचे किंवा स्पर्धा जिंकण्याचे दडपण मी घेत नाही. कारण विचारांमध्ये स्पष्टता असली की दडपण येत नाही, असे मत भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने खास मुलाखतीमध्ये व्यक्त केले. आंध्र प्रदेशातील गुंटूर या छोटय़ा शहरातून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या श्रीकांतने सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनला नमवण्याची किमया केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 गुंटूर कोणत्याही खेळासाठी प्रसिद्ध नाही. तू बॅडमिंटनकडे कसा वळलास?
गुंटूर छोटेखानी शहर आहे. घरात खेळाशी निगडित कोणीच नव्हतं. गुंटूरमध्ये एका नव्या स्टेडियमची उभारणी होत होती, ते पाहण्यासाठी माझा मोठा भाऊ नंदगोपाळ याच्याबरोबर मी गेलो. बॅडमिंटन कोर्ट पाहून भावाने खेळायला सुरुवात केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मीही रॅकेट खेळाचा ध्यास घेतला. प्रगत प्रशिक्षणासाठी लहान वयातच विशाखापट्टणम येथील साइ अकादमीत गेलो. सुधाकर रेड्डी सरांच्या मार्गदर्शनाखाली बारकावे शिकलो.
ल्ल घरच्यांचा पाठिंबा कसा होता?
२००३-०४ च्या सुमारास बॅडमिंटनला काहीही वलय नव्हतं. तेव्हा दोन मुलांना बॅडमिंटनसाठी दुसऱ्या शहरात पाठवण्याचा पालकांचा निर्णय धाडसी होता. आमची कारकीर्द कशी घडेल, आम्ही किती पैसा मिळवू हे न पाहता त्यांनी आम्हाला पाठवलं. निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं, कसलंही दडपण जाणवू दिलं नाही. आज भावासह माझं जे काही नाव होतंय त्याचं संपूर्ण श्रेय आईबाबांना आहे.
गोपीचंद अकादमीमुळे कारकीर्दीला वेगळे वळण मिळालं का?
हो, नक्कीच. माझा मोठा भाऊ नंदगोपाळने गोपीचंद अकादमीत सरावाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ मीही गोपीचंद अकादमीत येण्याचा निर्णय घेतला. अकादमीत येण्यापूर्वी मी प्रामुख्याने दुहेरी खेळत असे. मात्र गोपीचंद सरांनी एकेरी खेळण्याचा सल्ला दिला. तो शिरसावंद्य मानून खेळायला सुरुवात केली. प्रतिभावान मात्र बेफिकीर अशी माझ्यावर टीका व्हायची. अकादमीत आल्यानंतर आळशीपणा कमी झाला. दिवसभराचं शिस्तबद्ध प्रशिक्षण सुरू झालं. गोपीचंद सरांनी जिंकण्याची सवय अंगी बाणवली.
मोठय़ा लढतींमध्येही तू शांत दिसतोस, त्यामागचं रहस्य काय?
अंतिम फेरीचा सामना किंवा क्रमवारीतला अव्वल खेळाडू या गोष्टींनी माझ्यावर दडपण येत नाही. विचारात स्पष्टता असली की एकाग्रता भंग होत नाही. भूतकाळात मी कशी कामगिरी केली याचं ओझं माझ्या डोक्यावर नसतं आणि भविष्यात विशिष्ट गोष्ट साध्य करायची आहे असे विचार डोकावत नाहीत. आहे तो क्षण पुरेपर जगून वर्तमानात राहायला आवडतं. मी खेळायला सुरुवात केली, त्या वेळी २२ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंत असेन असा कधीही विचार केला नव्हता. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच खेळतो. पण मी त्याचा बाऊ करीत नाही.
लिन डॅनविरुद्ध लढतीचा अनुभव कसा होता?
ऑलिम्पिक पदकासह बॅडमिंटन विश्वातील सर्व स्पर्धाची जेतेपदे नावावर असणारा लिन दिग्गज खेळाडू आहे. त्याला पाहतच मी मोठा झालो. असंख्य सामने अपराजित राहण्याच्या त्याच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत. त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी हा कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण होता. कोणत्याही स्थितीतून अशक्य पुनरागमन करणाऱ्या लिनविरुद्ध काय रणनीती आखणार? लिनच्या नावाचे वलय, आकडेवारी, दंतकथा सगळं विसरून गेलो. माझ्यात बॅडमिंटनचं जे काही कौशल्य आहे ते सादर करण्याचा प्रयत्न केला. मी जिंकेन असा विचारच कोणी केला नव्हता. मी आघाडीवर होतो, मात्र लिनचं अद्भुत पुनरागमनाचं तंत्र प्रसिद्ध आहे. पण मी टक्कर देत खेळलो. अवघड परिस्थितीत गुण मिळवल्याच्या आनंदाने हुरळून जाण्याचा धोका होता. प्रशिक्षकांच्या मदतीने तो टाळला आणि स्वप्नवत विजय साकारला. सामना संपल्यानंतर काही तरी विलक्षण हातून घडल्याची जाणीव झाली.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे?
भारतातर्फे दोन पुरुष खेळाडूंना रिओवारीची संधी मिळणार आहे. पारुपल्ली कश्यप, मी, एच. एस. प्रणॉय, अजय जयराम शर्यतीत आहोत. पुढच्या पाच महिन्यांत ज्याची कामगिरी सर्वोत्तम असेल त्याची निवड होईल. पण आमच्यात निकोप स्पर्धा आहे. एकमेकांबाबत कोणतीही कटुता, द्वेषभावना नाही. प्रत्यक्षात ऑलिम्पिकसाठी पात्र होणंही अतिशय अवघड आहे. प्रयत्न करणं माझ्या हाती आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with srikanth kidambi