मुंबई सिटी एफसीच्या सुनील छेत्रीचे मत
‘‘पराभवातून धडा घेऊन विजयपथावर परतणे शक्य आहे. मात्र विजयाच्या धुंदीत अडकल्यावर मेहनत करण्याचा जणू विसर पडतो आणि पुढील वाटचालीवर त्याचे विपरीत परिणाम दिसतात. विजयाचा कैफ पराभवापेक्षा घातक असतो,’’ असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मुंबई सिटी एफसी क्लबचा आघाडीचा खेळाडू सुनील छेत्री याने व्यक्त केले.
इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दोन पराभव आणि एका सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागल्यानंतर मुंबई सिटीने घरच्या मैदानावर दिल्ली
(२-०) आणि गोवा (२-०) यांना नमवून दमदार पुनरागमन केले. या विजयात छेत्रीच्या तीन गोलचा समावेश होता. सलग दोन विजयानंतर मुंबईने गुणतालिकेत दोन स्थानांची झेप घेत सहावे स्थान गाठले. बुधवारी त्यांच्यासमोर विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान आहे. या लढतीच्या पूर्वसंध्येला छेत्रीने ‘लोकसत्ता’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
गतवर्षी झालेल्या आयएसएलच्या पहिल्या हंगामात खेळता न आल्यामुळे यंदा या स्पध्रेत आपली छाप पाडण्यासाठी छेत्री उत्सुक आहे. त्याची झलक त्याने दिल्ली व गोव्याविरुद्धच्या लढतीत दाखवली. त्याबाबत तो म्हणाला, ‘‘संघात आनंदाचे वातावरण आहे. विश्वचषक पात्रता फेरीतील सामने खेळून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्यानंतर मी आणि सुब्राता पॉल आयएसएलमध्ये दाखल झालो. त्याआधी क्लब दोन सामने खेळला होता. एफसी पुणे सिटीविरुद्धच्या ३-१ अशा मानहानीकारक पराभवानंतर मुंबईने दुसऱ्या लढतीत केरळा ब्लास्टरला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. तिसऱ्या लढतीत आम्ही क्लबसोबत होतो. घरच्या मदानावर चेन्नईविरुद्ध पहिला सामना खेळलो आणि त्यातही पराभव पत्करावा लागल्यामुळे संघाचे मनोबल खचले होते. त्यानंतर संघ ज्या पद्धतीने एकत्र झाला, त्याचा निकाल आपण पाहिला. दिल्ली आणि गोव्याविरुद्ध मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे.’’
प्रशिक्षक निकोलस अनेल्काची मैदानावरील आणि मदानाबाहेरील उपस्थिती संघासाठी किती प्रोत्साहन देणारी आहे, यावर छेत्री म्हणाला, ‘‘निकोलस अनेल्का संघात असता तर आम्ही नक्कीच मोठय़ा फरकाने विजय मिळवू शकलो असतो. पण माझ्यासाठी गोलफरक महत्त्वाचा नसून विजय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. व्यवस्थापक म्हणून निकोलस चांगली भूमिका बजावत आहेत. त्याच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होतोय. दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरले नसल्यामुळे ते मैदानावर अधिक काळ उतरू शकत नाही. मात्र ते जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडूचे मनोबल उंचावेल.’’
दिल्ली डायनामोजविरुद्धच्या लढतीत हैतीचा आघाडीचा खेळाडू सोनी नॉर्डे याने गोल करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, परंतु त्याला योग्य साथ न मिळाल्यामुळे मुंबईला दोन गोलवरच समाधान मानावे लागले. मात्र यावर नाराजी व्यक्तन करता छेत्रीने संधी उपलब्ध होणे, हे चांगले संकेत असल्याचे म्हटले. ‘‘एक स्ट्रायकर म्हणून तुम्हाला गोल करण्याची संधी मिळत नसेल, तर मनस्ताप वाढतो. गोल करण्याच्या संधी निर्माण होणे महत्त्वाचे आहे. तसे होत नसेल तर ती चिंतेची बाब आहे. सोनी नॉर्डी आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. गोल करण्यात त्याला अपयश येत असले तरी तो गोलजाळ्यापर्यंत चेंडू घेऊन जातो, ही जमेची बाजू आहे. तो लवकरच गोल करण्यात यशस्वी होईल आणि तो क्षण क्लबसाठी अविस्मरणीय असेल.’’

विजयाची हॅट्ट्रिक कोणाची?
नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर बुधवारी मुंबई सिटी एफसी आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड यांच्यापैकी विजयाची हॅट्ट्रिक कोण साजरी करणार याची उत्सुकता लागली आहे. मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर सलग दोन विजय साजरे केल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. मात्र, नॉर्थनेही त्यांच्या घरी गतविजेत्या अ‍ॅटलेटिको डी कोलकातासह चेन्नईयन एफसीला नमवून आपले नाणे खणखणीत केले आहे. त्यामुळे मुंबईला घरच्या मैदानावर युनायटेडकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३

मुंबईकडे पर्यायी खेळाडूंची फौज
शारीरिक तंदुरुस्तीत भारतीय खेळाडू पिछाडीवर आहेत, या गोष्टीशी मी सहमत नाही. भारतीय खेळाडू गुणवत्तेबाबत थोडेसे कमी पडत आहेत, परंतु यंदा भारतीय खेळाडूंचाच दबदबा दिसतोय. आशुतोष मेहता, सिंघम सुभाष सिंग, जॅकीचंद सिंग तेलेम, संदेश झिंगन, संजू प्रधान, इग्वेनसन लिंडोह आदी भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक सामन्यात आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंसह उतरू शकतो आणि हाच आमचा हुकमी एक्का आहे. लीग जसजशी पुढे जाईल, तसा हा एक्का आमच्या कामी येईल. कारण इतर क्लबच्या तुलनेत आमच्याकडे पर्यायी खेळाडूंची फौज आहे, असे छेत्री म्हणाला.

Story img Loader