vidit-gujrathi

विदित गुजराथी,आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू
मॅग्नस कार्लसन व विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या महान खेळाडूंचे कौशल्य अगदी जवळून पाहण्याची संधी मिळणे, हाच खरा दुर्मीळ योग असतो. मला जागतिक स्पर्धेत त्यांच्यासमवेत खेळण्याची संधी मिळाली. हा अनुभव भावी काळासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, असे नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सांगितले.
बर्लिन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक जलद व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विदितने भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा मानांकनांपैकी बहुतेक सर्व खेळाडूंचा समावेश होता. ओएनजीसीमध्ये नोकरी करणाऱ्या विदितने द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुकसह अनेक बलाढय़ खेळाडूंवर मात केली. विश्वविजेतेपदाची क्षमता असलेल्या लिवॉन आरोनियन याला त्याने बरोबरीत रोखले. या कामगिरीबाबत विदितशी केलेली खास बातचीत-
ल्ल जागतिक स्पर्धेचा अनुभव कसा होता?
जगातील श्रेष्ठ खेळाडूंची मांदियाळी असलेल्या या स्पर्धेत मला भाग घेता आला, ही माझ्या दृष्टीने खूप मोठी कामगिरी आहे. अनेक महान खेळाडूंचे कौशल्य अगदी जवळून पाहता आल्यामुळे मला खूप आनंद झाला. स्पर्धेतील एका फेरीच्या वेळी माझ्या शेजारच्या पटावर कार्लसन खेळत होता. त्याच्या प्रत्येक चालीत जबरदस्त आत्मविश्वास, खेळावरील निष्ठा, एकाग्रता दिसून येत होती. सामना खेळताना त्याच्या प्रत्येक चालीचे अतिशय बारकाईने निरीक्षण करता आल्यामुळे विश्वविजेता कसा खेळत असतो हे मी पाहू शकलो. आनंदबरोबर रोज गप्पागोष्टी होत असत. या स्पर्धेत खेळता आले हीच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती.
ल्ल ग्रिसच्युक याच्यावर विजय मिळविण्याची तुला खात्री होती?
ग्रिसच्युक हा अतिशय नामवंत खेळाडू आहे. त्याच्याविरुद्ध विजय मिळविण्याची मला खात्री नव्हती. मात्र त्याला शेवटपर्यंत चिवट लढत देण्याची मी तयारी केली होती. माझ्या सुदैवाने त्याच्या हातून एक नकळत चूक घडली व ही चूक माझ्या पथ्यावर पडली. तेथून मी मागे पाहिले नाही व त्याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. या स्पर्धेत अनेक अव्वल दर्जाच्या स्पर्धकांबरोबर खेळावे लागणार आहे, हे लक्षात घेऊनच मी मानसिक तयारी केली होती. चांगल्या कामगिरीचा आत्मविश्वास होता. आपल्या क्षमतेइतके कौशल्य दाखवीत खेळण्याचे माझे ध्येय होते व त्यानुसार मी खेळलो.
ल्ल आरोनियनविरुद्ध खेळण्याचा अनुभव कसा वाटला?
माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता. खरे तर त्याच्याविरुद्ध मी डाव जिंकू शकलो असतो. मात्र एवढय़ा महान खेळाडूविरुद्ध विजयासाठी धोका स्वीकारण्याऐवजी मी बरोबरीला प्राधान्य दिले. या डावानंतर लिव्हॉनने मला काही मौलिक सूचना केल्या. जिंकण्यासाठी कशा चाली करायला पाहिजे होत्या, हे त्याने मला सांगितले. माझ्यासाठी ही खूप मोठी पावती होती.
ल्ल नजीकचे ध्येय कोणते आहे?
राष्ट्रीय प्रीमिअर स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे माझे ध्येय आहे. या स्पर्धेत जरी तुल्यबळ खेळाडूंचा सहभाग असला तरी जागतिक जलद स्पर्धेतील अनुभवाचा फायदा घेत राष्ट्रीय विजेतेपदावर मोहर नोंदवण्याचा माझा प्रयत्न राहील. सध्या जागतिक स्तरावर माझे २६५१ मानांकन गुण आहेत. २७०० गुणांचा टप्पा लवकरात लवकर ओलांडण्यासाठी मी कसून सराव करीत आहे.
ल्ल आनंदचा वारसदार म्हणून तुझ्याकडे पाहिले जाते. त्यादृष्टीने कशी तयारी करणार आहे?
आमच्या पिढीतील खेळाडूंकडे आनंदचा वारसा पुढे चालवण्याची क्षमता आहे. मात्र युरोपियन खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर स्पर्धा करण्याची जेवढी संधी मिळते, तेवढी संधी भारतीय खेळाडूंना मिळत नाही. परदेशी खेळाडूंबरोबर अधिकाधिक डाव खेळण्याची संधी मिळाली तर निश्चितच आमच्या कामगिरीत आणखी सुधारणा होईल. पुण्यात महाराष्ट्र चेस लीग आयोजित केली जाते, तशा स्पर्धा महाराष्ट्रात आणि अर्थात देशात अनेक ठिकाणी आयोजित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्हाला स्पर्धात्मक बुद्धिबळाचा भरपूर अनुभव मिळेल. विशेषत: डावातील अंतिम टप्प्यात चाली करताना कल्पक डावपेचांची आवश्यकता असते. स्पर्धात्मक अनुभवाद्वारेच आम्हाला हे डावपेच शिकायला मिळतील व आपोआप आमचा दर्जा उंचावू शकेल.