Inzamam Ul Haq on Babar Azam and Virat Kohli: पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने सध्याचा संघाचा कर्णधार बाबर आझमचे कौतुक केले. त्याने बाबरच्या फलंदाजीचे तंत्र भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा चांगले असल्याचे वर्णन केले आहे. इंझमामचे हे वक्तव्य आशिया चषकाच्या तोंडावर आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या आधी हे विधान केल्याने चाहते याला माइंड गेम म्हणत आहेत. दोन्ही संघ २ सप्टेंबर रोजी आशिया एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत.
इंझमामने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून (कसोटी, एकदिवसीय, टी२०) २० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानी मीडिया संस्था जिओ न्यूजला सांगितले की, “बाबरची एक गोष्ट मला आवडते ती म्हणजे त्याला धावांची भूक मोठी आहे, तो नेहमी ५० झाल्यानंतर कधीच चुकीचा फटका खेळून बाद होत नाही. एवढी भूक मी इतर कोणत्याही खेळाडूत पाहिली नाही. दुसरी सकारात्मक बाब म्हणजे बाबर नेहमीच खेळावर लक्ष केंद्रित करतो. मला बाबर आझमला क्रिकेटचे मोठे विक्रम मोडताना बघायचे आहेत.
बाबर आझमचे फलंदाजी तंत्र विराटपेक्षा सरस आहे
माजी पाकिस्तानी कर्णधाराने बाबरच्या फलंदाजीचे तंत्र विराटपेक्षा चांगले असल्याचे वर्णन केले आहे. त्याचवेळी बाबरने विराट कोहलीशी केलेल्या तुलनेवर तो म्हणाला की, “जर तुम्ही आताच्या झटपट क्रिकेटकडे बघितले तर गेल्या काही वर्षांत दोघांची तुलना जास्त होऊ लागली आहे. या कालावधीतील दोघांचे रेकॉर्ड पाहिल्यास बाबर विराटपेक्षा थोडा पुढे असल्याचे लक्षात येईल. मात्र, मला विश्वास आहे की दोघेही महान फलंदाज आहेत.
३० वर्षांच्या वयानंतर फलंदाजांचा पीक टाईम येतो
एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, इंझमाम उल हक म्हणाला की, “३० वर्षे वय ओलांडल्यानंतर फलंदाजाचा पीक टाईम येतो. मग तो त्याच्या शिखराकडे जातो आणि सर्वोत्तम देतो. बाबरने अद्याप वयाची तिशी ओलांडली नाही. मात्र, त्याआधीच त्याने आतापर्यंत बरेच काही साध्य केले आहे. मला खात्री आहे की जेव्हा त्याचा पिक टाईम येईल तेव्हा तो अधिक निखारून निघेल, त्याची सर्वोत्तम वेळ अजून यायची आहे. तो पाकिस्तान संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करेल आणि संघाला पुढे नेईल. फलंदाजीतील सर्वाधिक विक्रम त्याच्या नावावर असतील.”
विराट आणि बाबरबद्दल असे सांगितले
तो पुढे म्हणाला, “होय, दोन्ही खेळाडू खूप चांगले आहेत. बाबर विराटपेक्षा लहान आहे पण, तुम्ही विराटला त्याच्यापेक्षा अधिक प्राधान्य द्याल. तो आशिया चषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. हे टी२० क्रिकेट नाही तर वनडे फॉरमॅट आहे.”