आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घातलेल्या बंदीवर चर्चा करण्यासाठी आणि पुन्हा ऑलिम्पिक समितीवर परतण्याकरिता तोडगा काढण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) शिष्टमंडळ शुक्रवारी केंद्रीय क्रीडा सचिवांची भेट घेणार आहे.
‘‘अभयसिंग चौटाला यांच्या नेतृत्वाखालील आयओएचे शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता क्रीडा सचिवांना भेटणार आहे. या भेटीत आयओएची पुढील भूमिका काय असेल, यावर चर्चा केली जाणार आहे.’’ आयओएची परिस्थिती आयओसीला समजावून सांगण्यासाठी यापूर्वीच आर. के. आनंद आणि नरिंदर बात्रा या दोनसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
‘‘आयओएची नवी कार्यकारिणी समिती खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी कटिबद्ध असेल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही खेळाडूंवर अन्याय होऊ देणार नाहीत. आयओएवरील बंदी लवकरात लवकर उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे आयओएच्या पत्रकात म्हटले आहे.
आयओएच्या सल्लागार समितीत पी.टी.उषा, गोपीचंद
खेळाडूंच्या गरजा आणि त्यांना होणाऱ्या समस्यांविषयी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तीनसदस्यीय सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली असून त्यात पी.टी.उषा, पुलेला गोपीचंद आणि दिलीप तिर्की यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नऊसदस्यीय अॅथलीट्स आयोगाचीही स्थापना करण्यात आली असून गुरबचन सिंग रंधवाकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या समितीत विल्सन शेरियन (जलतरण), कर्नाम मल्लेश्वरी (वेटलिफ्टिंग), मनजीत दुआ (टेबलटेनिस), जतिंदर सिंग (बॉक्सिंग), अपर्णा पोपट (बॅडमिंटन), अनुज कुमार (कुस्ती) या सदस्यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा