बॉक्सिंगच्या राष्ट्रीय संघटनेबाबत निर्णय घेण्यास येथील उच्च न्यायालयाने भारतीय ऑलिम्पिक महासंघास (आयओए) आदेश दिला आहे. मात्र बॉक्सिंग इंडिया व भारतीय हौशी बॉक्सिंग संघटना (आयएबीएफ) यापैकी कोणास राष्ट्रीय संघटनेचा दर्जा द्यावा याबाबत आयओए संभ्रमात पडले असून त्यांनी याबाबत संलग्न राज्य संघटनांची मते मागवली आहेत.
उच्च न्यायालयाने आयओएला ३१ जानेवारीपूर्वी हा निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे, तसेच न्यायालयाने बॉक्सिंग इंडियास आयओएकडे मान्यतेसाठी अर्ज करण्याचा आदेश दिला आहे. आयएबीएफ ही यापूर्वीच आयओएला संलग्न असलेली संघटना आहे. बॉक्सिंग इंडिया व आयएबीएफ या दोन्ही संघटनांना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता नाही.
आयओएकडून येणाऱ्या निर्णयाच्या आधारे देशात कोणती राष्ट्रीय संघटना अधिकृत संघटना असावी याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने १५ मार्चपूर्वी निर्णय घ्यावा, असेही उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयास कळविले आहे. आयओएची शिफारस असलेल्या कोणत्याही संघटनेस मान्यता दिली जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने कळविले आहे. त्यामुळे आयओएच्या शिफारसीनंतर मंत्रालयाने जरी निर्णय घेतला तरी त्यास आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता मिळण्याबाबत साशंकता आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने सध्या अस्थायी समितीस मान्यता दिली असून भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या नावाखाली भाग घेता येते.
देशातील अधिकृत राष्ट्रीय संघटना ठरविण्याचे अधिकार फक्त आपल्याला आहेत व आपण केलेल्या शिफारशीस आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता मिळेल, असा आयओएचा दावा आहे.

Story img Loader