आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग संघटना बरखास्त केल्यानंतर त्याचबरोबर क्रीडा मंत्रालयानेही मान्यता काढून घेतल्याचा फटका भारतीय बॉक्सर्स आणि प्रशिक्षकांना बसू नये, यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) प्रशिक्षण आणि संघ निवडीबाबतचे मुद्दे सोडवण्यासाठी अस्थायी समिती नेमली आहे.
एन. रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखालील आयओएच्या कार्यकारी समितीची पहिली बैठक गुरुवारी नवी दिल्लीत झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. रामचंद्रन म्हणाले, ‘‘भारतीय बॉक्सर्स आणि प्रशिक्षकांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सहभागावर गदा येऊ नये, यासाठी अस्थायी समिती नेमण्याचा निर्णय आम्ही घेतला. ऑलिम्पिक चळवळीचा अनुभव असलेले तरलोचन सिंग हे या समितीचे प्रमुख असतील. तसेच बॉक्सिंगचे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे भारताचे प्रतिनिधी किशन नरसी यांचा या समितीत समावेश असणार आहे. या समितीला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने मान्यता दिली आहे.’’
‘‘भारतीय बॉक्सर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी केंद्र सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जाईल. जर सरकारने ही जबाबदारी टाळली तर आयओए या प्रकरणी अंतिम निर्णय घेईल. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने भारतीय बॉक्सिंग संघटनेला मान्यता दिल्यास, आयओएकडूनही मान्यता देण्यात येईल,’’ असेही रामचंद्रन यांनी सांगितले.
बॉक्सिंगसाठी आयओएची अस्थायी समिती
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग संघटना बरखास्त केल्यानंतर त्याचबरोबर क्रीडा मंत्रालयानेही मान्यता काढून घेतल्याचा फटका भारतीय बॉक्सर्स आणि प्रशिक्षकांना बसू नये
First published on: 04-04-2014 at 05:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ioa names ad hoc panel for boxing