भ्रष्टाचारी व्यक्तींबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) आपल्या आचारसंहितेत केलेल्या बदलांचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) स्वागत केले असून, भारताला ऑलिम्पिकमध्ये परत स्थान मिळावे यासाठी आयओएने नव्याने निवडणूका घ्याव्यात, असे आदेश आयओसीने दिले आहेत.
आयओसीचे नवनियुक्त अध्यक्ष थॉमस बॅच यांच्या नेतृत्वाखाली लुसाने येथे झालेल्या कार्यकारिणी समितीच्या पहिल्या बैठकीत आयओएने आचारसंहितेत केलेल्या बदलांवर आयओसीने समाधान व्यक्त केले. ‘‘आयओसीच्या घटनेप्रमाणे आयओएने नैतिकता, योग्य व्यवस्थापन आणि एकात्मतेच्या बाबतीत प्राथमिक दर्जा राखणे गरजेचे आहे. त्याचआधारे आयओएने आपल्या आचारसंहितेत बदल करण्याचे ठरवले, ही स्तुत्य गोष्ट आहे. आयओसीची कार्यकारिणी समिती या सकारात्मक बदलांचे स्वागत करते. आयओएने लवकरात लवकर निवडणूका घेतल्या तर त्यांचा ऑलिम्पिकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा होईल,’’ असे आयओसीच्या पत्रकात म्हटले आहे.
आयओएने येत्या ९ फेब्रुवारी रोजी नव्याने निवडणूका घेण्याचे ठरवले आहे. पण भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला या निवडणूका यशस्वीपणे घेण्यात अपयश आले तर ७ ते २३ फेब्रुवारी रोजी सोची येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकच्या झेंडय़ाखाली सहभागी व्हावे लागेल. भारताचा झेंडा किंवा कोणतेही बोधचिन्ह या स्पर्धेत वापरता येणार नाही, असे कार्यकारी समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने या घडामोडींचे स्वागत केले आहे. ‘‘आता लवकरच भारताला ऑलिम्पिकमध्ये परतता येईल. सोची क्रीडा स्पर्धेआधी सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा आहे.’’
देशातील क्रीडाकारभार पारदर्शकपणे व्हावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्लीन स्पोर्ट्स इंडिया (सीएसआय) या संस्थेने आयओसीचे आभार मानले आहेत. ‘‘सुरेश कलमाडी, अभय सिंग चौटाला, ललित भानोत आणि अन्य भ्रष्ट पदाधिकाऱ्यांवरील भारतीय न्यायालय मागे घेत नाही तोपर्यंत त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, ही आयओएची सुधारित आचारसंहिता आयओसीने मान्य केली, हा सीएसआयचा नैतिक विजय म्हणावा लागेल. आता माजी खेळाडूंनी पुढे येऊन निवडणूक लढवून खेळात पारदर्शकता आणण्याची संधी मिळणार आहे,’’ असे सीएसआयचे प्रवक्ते बी. व्ही. पी. राव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा