मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अध्यक्षपदाचा थॉमस बाख यांचा कार्यकाळ २०२५मध्ये संपत आहे. मात्र, सलग तिसऱ्यांदा बाख यांना अध्यक्षपदाचा मान मिळावा, अशी मागणी ‘आयओसी’च्या सदस्यांनीच रविवारी केली.
जर्मनीचे माजी ऑलिम्पिकपटू बाख हे ‘आयओसी’चे नववे अध्यक्ष आहेत. अर्जेटिनात २०१३मध्ये झालेल्या ‘आयओसी’च्या १२५व्या अधिवेशनात आठ वर्षांसाठी बाख यांची अध्यक्षपदी निवड झाली. हा कार्यकाळ २०२१मध्ये संपला, तेव्हा त्यांची चार वर्षांसाठी फेरनिवड झाली.
‘आयओसी’च्या अध्यक्षचा कार्यकाळ प्रदीर्घ राहू नये हा आदर्श जॅक्स रॉज यांनी घालून दिला होता. ते स्वत: १२ वर्षे अध्यक्ष होते. हा कालावधी काम करण्यासाठी पुरेसा आहे, असे मत त्यांनी मांडले होते. बाख यांनी रॉज यांच्याकडूनच पदभार स्वीकारला होता.
हेही वाचा >>> भारत-पाकिस्तान सामना प्रत्यक्ष बघणे उर्वशी रौतेलाला पडले महागात; स्टेडियममध्ये हरवला २४ कॅरेट गोल्ड आयफोन, म्हणाली…
मुंबईत रविवारपासून सुरू झालेल्या ‘आयओसी’च्या १४१व्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी ९९ सदस्यांपैकी बहुतेकांनी २०२५मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर बाख यांना तिसऱ्यांदा संधी द्यावी असा आग्रह धरला. हा निर्णय झाल्यास ऑलिम्पिक चळवळीच्या घटनेत तसा बदल करावा लागणार आहे.
‘आयओसी’ सदस्य लुईस मेईया ओव्हिएडो म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हाला पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग दाखवला आहे. आम्हाला ऑलिम्पिक चळवळ अशीच पुढे न्यायची आहे. त्यासाठी तुमचे नेतृत्व आवश्यक आहे.’’
मुंबईत सुरू असलेल्या या अधिवेशनात सोमवारी क्रिकेटसह अन्य चार खेळांच्या ऑलिम्पिक समावेशावर मतदान होणार आहे.
माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी आभारी आहे. तुमच्या भावना माझ्या हृदयाला भिडल्या असून, मी स्वत:ला धन्य मानतो. – थॉमस बाख