आयपीएलच्या सहाव्या पर्वाचे बाद फेरीचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे सध्या गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर असलेले संघ रुबाबात घोडदौड करीत आहेत. यंदाच्या हंगामातील सर्वात तुल्यबळ असे हे दोन संघ रविवारी एकमेकांशी भिडणार आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ घरच्या मैदानावर मोसमातील अखेरचा सामना खेळणार आहे. चेपॉकवर चेन्नईने त्यांना हरवले होते. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी राजस्थानचा संघ उत्सुक आहे. परंतु क्रिकेटरसिकांना मात्र एका रोमहर्षक सामन्याची उत्सुकता आहे.
राजस्थानचा आतापर्यंतचा प्रवास हा लक्षवेधक असाच झाला आहे. राजस्थानचे मागील दोन सामन्यांमधील विजय हे त्यांच्या कामगिरीचे द्योतक असेच ‘रॉयल्स’ होते. दोन वेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाही ते स्वप्न पुन्हा पूर्ण करण्यासाठी आसुसलेला आहे.
दोन्ही संघांचे फलंदाज दमदार फॉर्मात आहेत. चेन्नईची गोलंदाजी ही राजस्थानच्या तुलनेत अधिक प्रगल्भ आहे. मोहित शर्माने आघाडीची जबाबदारी सांभाळली आहे, तर आर. अश्विन आणि ड्वेन ब्राव्हो मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवतात. मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जकडून धक्कादायकरीत्या पराभूत झाल्यानंतर अत्यंत धोकादायक भासत आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी मायकेल हसी किंवा सुरेश रैनाला जरी तंबूची वाट दाखवली तरी त्यांचा फॉर्मात असलेला संघनायक महेंद्रसिंग धोनी आपल्या बेफाम फटकेबाजीने सामन्याचे चित्र पालटू शकतो.
जेम्स फॉल्कनर, अजित चांडिला, केव्हॉन कुपर आणि शेन वॉटसन या गोलंदाजांवर राजस्थानची मदार असेल. याशिवाय राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, वॉटसन आणि संजू सॅमसन यांच्यासमवेत राजस्थानची फलंदाजीची फळीसुद्धा मजबूत आहे.

सामना : चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स.
स्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर.
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

Story img Loader