ख्रिस गेल, विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स यांच्यासारख्या खंद्या फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सुनील नरिनच्या फिरकीपुढे काहीच चालले नाही. याचप्रमाणे जॅक कॅलिसला सूर गवसला आणि त्याच्या अष्टपैलू खेळामुळे रांचीच्या झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील पदार्पणाच्या सामन्यात क्रिकेटरसिकांना पर्वणी मिळाली. त्यामुळेच गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने चक्क बंगळुरूला पराभवाचा धक्का देण्याची किमया साधली. अखेरच्या षटकांमध्ये रोमहर्षक झालेली ही लढत कोलकात्याने चार चेंडू आणि पाच विकेट राखून जिंकत बंगळुरूच्या चिंतेत भर टाकली आहे.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला २० षटकांत फक्त ११५ धावाच करता आल्या. गेलने ३३ कोहलीने १७ आणि डी’व्हिलियर्सने २८ धावा केल्या. पण नरिन, कॅलिस आणि लक्ष्मीपती बालाजीच्या गोलंदाजीपुढे कोलकाताचा धावांचा आलेख फारसा उंचावू शकला नाही. नरिनने २२ धावांत ४ बळी घेतले.
त्यानंतर कॅलिसने फलंदाजीतही करिष्मा दाखवताना ४५ चेंडूंत ४१ धावा केल्या, तर मनोज तिवारीने २७ चेंडूंत २४ धावा केल्या. त्यामुळेच कोलकाताचा विजय सुकर झाला. १८व्या षटकात विनयने टिच्चून गोलंदाजीत आशा निर्माण केल्या. अखेरच्या षटकात कोलकाताला ५ धावा हव्या होत्या. परंतु दुसऱ्याच चेंडूवर रयान टेन डोइश्चॅटने चेंडू सीमापार धाडून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयानिशी कोलकाता नाइट रायडर्सने १४ सामन्यांत १२ गुण जरी जमा केले असले तरी त्यांची बाद फेरीची वाट बिकट आहे. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खात्रीचा विजय मिळवण्याची संधी गमावल्यामुळे त्यांच्या खात्यावर १४ सामन्यांत १६ गुण जमा आहेत. त्यामुळे आता बंगळुरूला उर्वरित दोन सामन्यांत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ९ बाद ११५ (ख्रिस गेल ३३, विराट कोहली १७, ए बी डी’व्हिलियर्स २८; एल. बालाजी २/२२, सुनील नरिन ४/२२, जॅक कॅलिस २/१७) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.२ षटकांत ५ बाद ११६ (जॅक कॅलिस ४१, मनोज तिवारी २४; आर. विनय कुमार २/१७)
सामनावीर : जॅक कॅलिस.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा