‘वानखेडेवर राज्य आमचेच’ हे पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील आठवा आणि वानखेडेवरील सहावा विजय मिळवत गुणतालिकेत दुसरा स्थान पटकावत दाखवून दिले. सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथच्या दणकेबाज सलामीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १७० धावांचा पल्ला गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सची मुंबईने भेदक माऱ्याच्या जोरावर फेफे उडवली आणि ६५ धावांनी सहजपणे सामना खिशात टाकला.
मुंबईच्या १७१ धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव १०५ धावांतच आटोपला. पहिल्याच षटकात मिचेल जॉन्सनने कर्णधार गौतम गंभीरचा (०) त्रिफळा उद्ध्वस्त करत कोलकात्याला धक्का दिला. या धक्क्यातून कोलकाता सावरू शकला नाही आणि त्यांची ५ बाद ७७ अशी अवस्था झाल्यावर मुंबई सामना जिंकेल हे पक्के झाले होते.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत मुंबईने पुन्हा एकदा फलंदाजी घेतली आणि कोलकात्यापुढे १७१ धावांचे आव्हान ठेवले. बालाजीने पहिले षटक निर्धाव टाकले असले तरी रायन मॅकलॅरेनचा सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ (४७) यांनी समाचार घेतला. त्याच्या पहिल्या षटकात स्मिथने दोन, तर दुसऱ्या षटकात सचिनने तब्बल पाच चौकार वसूल केले. मॅकलॅरेनने अखेरच्या षटकात तब्बल २५ धावा आंदण देत ४ षटकांत ६० धावा दिल्या. सचिनने २८ चेंडूंत ८ चौकार लगावत सर्वाधिक ४८ धावा काढल्या. सचिन-स्मिथने ९३ धावांची सलामी दिली असली तरी मुंबईने पाच विकेट्स फक्त २२ धावांमध्ये गमावल्या. रोहित शर्माचा (१६) ‘स्क्वेअर लेग’ला सीमारेषेवर अप्रतिम झेल इऑन मॉर्गनने टिपला, तर अंबाती रायुडू (०) आणि हरभजन सिंग (०) यांनी धावचीत होत आत्मघात केला. पण दिनेश कार्तिकने एक बाजू लावून धरत १८ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ३४ धावा केल्या आणि मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १७० (सचिन तेंडुलकर ४८, ड्वेन स्मिथ ४७; रजत भाटीया १/२२) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.२ षटकांत सर्व बाद १०५ (जॅक कॅलिस २३; हरभजन ३/२७, मिचेल जॉन्सन २/१३). सामनावीर : सचिन तेंडुलकर.
टिट-बिट्स
शाहरुखने क्रेझी किया रे..
वानखेडेवरच्या आजच्या सामन्यापेक्षा जास्त चर्चा होती ती शाहरुख खान स्टेडियमवर येणार की नाही याचीच. दिवसभरातील घडामोडी पाहता मुंबई क्रिकेट असोसिएशन एकटे पडले असले तरी ते त्यांच्या शाहरुख बंदीवर ठाम होते, पण प्रेक्षकांमध्ये याबद्दल फार क्रेझ होती. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते. स्टेडियममध्ये जेव्हा लाइट्स गेल्या तेव्हा शाहरुख ‘डॉन’च्या अवतारात वानखेडेवर उतरणार असल्याच्या अफवांना पेव फुटले होते. ‘शाहरुख नसला तरी कोलकात्याला आम्ही पांठिबा देऊ,’ अशा फलकाने सर्वाचेच लक्ष वेधले होते.
ठेवणीतले ऑस्ट्रेलियन्स
मुंबई इंडियन्स विजयरथावर आरूढ असताना जास्त बदल करताना दिसत नाही. संघातील एका युवा खेळाडूला दोन सामने खेळवून बदलत असलेल्या ऑस्ट्रेलियन्सचे काय, हा प्रश्न साऱ्यांपुढे आहे. रिकी पॉन्टिंगला वाजत-गाजत मुंबईच्या कर्णधारपदी आणला, पण गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात नसल्यामुळे त्यानेच न खेळण्याचा निर्णय घेतला. तर डोक्यावर उचलून आणलेल्या आणि दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चून आणलेल्या ग्लेन मॅक्सवेलला खेळविण्यासाठी मुंबईच्या संघाने नेमका कोणता मुहूर्त काढलाय, कोण जाणे?
सचिनचे चौकारांचे पंचक
गेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सावध फलंदाजी करणाऱ्या सचिन तेंडुलकरने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मात्र संघाला चांगली सुरुवात करून दिली. रायन मॅकलेरनच्या दुसऱ्या षटकात सचिनने तब्बल पाच चौकार लगावत २० धावा वसूल केल्या. वानखेडेवरच बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सचिनने एका षटकात चार चौकार लगावले होते.
‘स्ट्रॅटेजिक टाइम-आऊट’
वानखेडेवर तब्बल १८ मिनिटांचा खेळ वाया गेला तो बत्ती गुल झाल्यामुळे. पहिल्यांदा सचिन तेंडुलकर स्टॅण्डची बत्ती गुल झाली आणि त्यानंतर काही वेळातच गरवारे पॅव्हेलियनची. ८ वाजून ४५ मिनिटांनी जी बत्ती गुल झाली ती पुन्हा आली ९ वाजून ३ मिनिटांनी. जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे वानखेडेवरचे दोन प्रकाशझोत बंद झाले होते. या ‘ब्लॅकआऊट’ आऊटची संधी घेत ‘चीअर गर्ल्स’ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
– प्रसाद मुंबईकर