राजस्थानची भूमी ही अभेद्य गडकिल्ल्यांसाठी ओळखली जाते. यंदाच्या हंगामात राजस्थानसाठी जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम ही अभेद्य तटबंदी ठरली आहे. गुणतालिकेत तळाच्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहजपणे नमवत राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर आपले प्रभुत्त्व सिद्ध केले. दिल्लीला १५४ धावांवर रोखत राजस्थानने हे आव्हान दमदार सलामीच्या आधारे पार केले. नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत राजस्थानने बाद फेरीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
१५५ धावांचा पाठलाग करण्यासाठी राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे जोडी मैदानात उतरली. सिद्धार्थ कौलने पहिले षटक निर्धाव टाकल्याने सामना रंजक होऊ शकतो याचे संकेत मिळाले. मात्र यानंतर द्रविड-रहाणे जोडीने कलात्मक फलंदाजीचे सुरेख प्रदर्शन घडवले. कोणतेही धोकादायक फटके न खेळता जमिनीलगतच्या फटक्यांवर भर देत या जोडीने चौकारांची लयलूट केली. मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, अजित आगरकर तसेच अन्य गोलंदाजांना या जोडीला रोखण्यात सपशेल अपयश आले. या जोडीने १०८ धावांची सलामी दिली. सिद्धार्थ कौलला मोठा फटका खेळण्याच्या नादात द्रविड आगरकरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ७ चौकारांसह ५३ धावांची खेळी केली. द्रविड बाद झाल्यानंतर रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले. शेन वॉटसनने १४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा फटकावल्या. रहाणेने ५ चौकार आणि एका षटकारासह ४५ चेंडूत ६३ धावांची नाबाद खेळी केली.
तत्पूर्वी बेन रोहररच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने १५४ धावांची मजल मारली. हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा डाव अवघ्या ८० धावांतच संपुष्टात आला होता. या सुमार प्रदर्शनाच्या तुलनेत सन्मानजनक फलंदाजी करण्याचे आव्हान दिल्लीसमोर होते. वीरेंद्र सेहवागने जेम्स फॉल्कनरला दोन खणखणीत चौकार लगावत चांगली सुरुवात केली मात्र त्याच षटकात फॉल्कनरने त्याला त्रिफळाचीत केले. पहिल्यांदाच अंतिम अकरांत खेळण्याची संधी मिळालेल्या मुरलीधरन गौतमला शेन वॉटसनला झटपट बाद केले. २ बाद २२ अशा स्थितीतून डेव्हिड वॉर्नर आणि महेला जयवर्धने यांनी २५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. वॉर्नर स्थिरावलाय असे वाटत असतानाच स्टुअर्ट बिन्नीने त्याला चकवले. त्याने १३ धावा केल्या. यानंतर जयवर्धनेने बेन रोहररला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. सिद्धार्थ त्रिवेदीने जयवर्धनेचा अडसर दूर केला. जयवर्धनेने ४ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या. जयवर्धने बाद होताच रोहररने सामन्याची सूत्रे हाती घेतली. ९ चौकार आणि एका षटकारासह रोहररने ४० चेंडूत ६४ धावा फटकावल्या. केदार जाधवने २३ धावा करत रोहररला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ७६ धावांची भागीदारी केली. या भागादीमुळेच दिल्लीने दीडशेचा टप्पा ओलांडला. जेम्स फॉल्कनर, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १५४ (बेन रोहरर नाबाद ६४, माहेला जयवर्धने ३४, शेन वॉटसन १/२१, सिद्धार्थ त्रिवेदी २/२१) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १७.५ षटकांत १ बाद १५५ (अजिंक्य रहाणे नाबाद ६३, राहुल द्रविड ५३, सिद्धार्थ कौल १/२३)
सामनावीर : अजिंक्य रहाणे
राजस्थान ‘अजिंक्य’!
राजस्थानची भूमी ही अभेद्य गडकिल्ल्यांसाठी ओळखली जाते. यंदाच्या हंगामात राजस्थानसाठी जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम ही अभेद्य तटबंदी ठरली आहे. गुणतालिकेत तळाच्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहजपणे नमवत राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर आपले प्रभुत्त्व सिद्ध केले.
First published on: 08-05-2013 at 05:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 013 rajasthan royals register comprehensive win at home