अनपेक्षित पराभवांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलच्या सहाव्या पर्वाच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दैवावर भरवसा ठेवावा लागत आहे. आव्हान टिकविण्यासाठी बंगळुरूला जिंकण्याशिवाय पर्यायच नाही. पण अखेरची लढत बंगळुरूसाठी सोपी नक्कीच नाही. शनिवारी त्यांच्यापुढे आव्हान उभे आहे ते दोन वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचे.
मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने आश्चर्यकारक पद्धतीने बंगळुरूचा सात विकेट राखून पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे बाद फेरीतील स्थान पक्के झाले आहे. या तीन संघांनी गुणतालिकेत गुणांची विशी गाठली आहे. त्यामुळे ‘प्ले-ऑफ’मधील चौथ्या स्थानासाठी आता बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात तीव्र चुरस आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सवरील विजयामुळे पंजाबच्या खात्यावर १४ गुण जमा आहेत, तर बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या खात्यावर १६ गुण जमा आहेत. पंजाबचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा एकमेव सामना बाकी आहे आणि त्यांनी १६ गुण केल्यास उत्तरार्धातील ही उत्कंठा अधिक वाढणार आहे. बंगळुरूने शनिवारी चेन्नईला हरविल्यास त्यांच्या खात्यावर १८ गुण जमा होतील. परंतु तरीही त्यांचे अंतिम चौघांमधील स्थान पक्के होणार नाही. हैदराबाद आणि पंजाब यांचा उर्वरित सामन्यांत पराभव झाला तरच बंगळुरूचे नशीब उजळेल.
बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात १३ एप्रिलला एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर गाठ पडली होती. त्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा चार विकेट राखून पराभव केला होता. चेन्नईने या हंगामातील आतापर्यंतच्या १५ सामन्यांपैकी फक्त चार सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईने हा सामना जिंकल्यास बंगळुरूच्या चिंता आणखी वाढू शकतील.
सलामीवीर ख्रिस गेलला रोखणे चेन्नईच्या गोलंदाजांसाठी सर्वात आव्हानात्मक असेल. एम. चिन्नास्वामी हे गेलसाठी आवडते मैदान आहे. त्याने या हंगामातील ६८० धावांपैकी ५०४ धावा या मैदानावर केल्या आहेत. नाबाद १७५ धावांची ऐतिहासिक खेळीसुद्धा त्याने याच मैदानावर साकारली आहे. याचप्रमाणे विराट कोहली, ए बी डी’व्हिलियर्ससुद्धा फॉर्मात आहेत.
चेन्नईची मदार असेल ती मायकेल हसीवर. याचप्रमाणे सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीसुद्धा चांगली फलंदाजी करीत आहेत. पर्पल कॅप परिधान करणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या खात्यावर २४ बळी जमा आहेत.

सामना : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स<br />स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

Story img Loader