आयपीएलच्या सहाव्या पर्वाला गुरुवारी स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने हादरविले. एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. भारतीय क्रिकेट इतिहासातील हा काळा दिवस ठरला. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवरील सामना संपल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने मध्यरात्री मुंबईतून अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली. तथापि, श्रीशांत त्याच्या मित्राच्या घरी अटक करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी मुंबईहून सात आणि दिल्लीहून तीन सट्टेबाजांना अटक केली केली आहे. दिल्लीतील आणखी दोन सट्टेबाजांचा तपास सुरू असल्याचे समजते. या तीन क्रिकेटपटूंना भारतीय दंड विधेयक कलम ४२० (फसवणूक) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) याअंतर्गत अटक करण्यात आली असून, त्यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे.
बीबीएम आणि व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाठविलेल्या संदेशांचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. यात सांकेतिक भाषेचा वापर करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. २००८मध्ये आयपीएल क्रिकेटच्या पर्वाला भारतात प्रारंभ झाला. तेव्हापासून वाद हे या स्पध्रेच्या पाचवीला पुजल्याचे प्रत्ययास येत आहे.
गेल्या वर्षी स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी टी. पी. सुधिंद्र (डेक्कन चार्जर्स), मोहनिष मिश्रा (पुणे वॉरियर्स), अमित यादव, शलभ श्रीवास्तव (दोघेही किंग्ज ईलेव्हन पंजाब) आणि अभिनव बाली या पाच जणांवर बीसीसीआयने कठोर कारवाई केली होती.