सलग तीन सामने जिंकून आयपीएलच्या सहाव्या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या बलाढय़ मुंबई इंडियन्ससमोर बुधवारी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात यजमान हैदराबाद सनरायजर्सचे आव्हान असणार आहे. लागोपाठच्या पराभवांतून सावरण्यासाठी सनरायजर्सना पुरेसा वेळ नसल्यामुळे मुंबईविरुद्ध त्यांची कसोटी लागणार आहे.
या मोसमाच्या पहिल्या टप्प्यात दाखवलेला फॉर्म टिकवण्यासाठी सनरायजर्सना फलंदाजीत सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. मुंबईचे ९ सामन्यांत १२ गुण झाले असून सनरायजर्सने ९ सामन्यांत १० गुणांची कमाई केली आहे. गोलंदाजी ही सनरायजर्सची भक्कम बाजू असली तरी फलंदाजीतील खराब फॉर्मची चिंता त्यांना सतावत आहे. शिखर धवन, कुमार संगकारा, हनुमा विहारी, करण शर्मा आणि थिसारा परेरा हे सनरायजर्सचे प्रमुख फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.
चेन्नईत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने योगदान दिले नाही. अन्यथा चेन्नईसाठी हा सामना जिंकणे अवघड गेले असते. धवन फॉर्मात परतल्याने तसेच संघात वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीचा समावेश करण्यात आल्याने सनरायजर्सची फलंदाजी सुधारली असली तरी संगकाराचा खराब फॉर्म त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरत आहे. सनरायजर्सने आतापर्यंत गोलंदाजांच्या बळावर अनेक सामने जिंकले आहेत. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेन तसेच इशांत शर्मा, लेगस्पिनर अमित मित्रा, डॅरेन सॅमी, थिसारा परेरा आणि करण शर्मा यांनी गोलंदाजीत आपली छाप पाडली आहे.
मुंबई संघ सध्या तुफान फॉर्मात आहेत. गेल्या काही सामन्यांत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, ड्वेन स्मिथ आणि किरॉन पोलॉर्ड हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडत आहेत. स्मिथ, पोलार्ड, रोहित आणि सचिन यांनी सांघिक कामगिरी केली तर मुंबईचा पाडाव करणे सनरायजर्ससाठी आव्हानच ठरणार आहे. लसित मलिंगा, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी आणि मिचेल जॉन्सन अशी तगडय़ा गोलंदाजांची फौज मुंबईकडे आहे. मात्र मुंबईला हरवण्यासाठी सनरायजर्सना घरच्या वातावरणाचा फायदा उठवावा लागणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बलाढय़ संघांवर मुंबईने सहज विजयाची नोंद केली असली तरी घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाडाव करताना मुंबईच्या नाकी नऊ आले होते. अवघ्या चार धावांनी मुंबईला विजय साकारता आला. मुंबईचे १७५ धावांचे आव्हान पेलताना किंग्ज इलेव्हन पंजाबने कडवी झुंज दिली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाच धावांची आवश्यकता असताना धवल कुलकर्णीने प्रवीण कुमारला झेलबाद केले आणि मुंबईच्या खात्यात सहाव्या विजयाची भर घातली. त्यामुळे सनरायजर्सच्या फलंदाजांसमोर मुंबईच्या गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.पासून.
मुंबईची लढाई सनरायजर्सशी!
सलग तीन सामने जिंकून आयपीएलच्या सहाव्या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या बलाढय़ मुंबई इंडियन्ससमोर बुधवारी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात यजमान हैदराबाद सनरायजर्सचे आव्हान असणार आहे. लागोपाठच्या पराभवांतून सावरण्यासाठी सनरायजर्सना पुरेसा वेळ नसल्यामुळे मुंबईविरुद्ध त्यांची कसोटी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2013 at 02:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 013 sunrisers hyderabad take on mighty mumbai indians