फिरोझशाह कोटला स्टेडियमवर ख्रिस गेल नावाचे वादळ घोंगावले नाही. परंतु तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयापासून रोखण्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्या मैदानावर अपयश आले. कप्तान विराट कोहलीने ९९ धावांची चौफेर फटकेबाजी साकारत पाया रचला, त्यानंतर जयदेव उनाडकटने २५ धावांत ५ बळी घेत कळस चढवला. त्यामुळेच बंगळुरूने आयपीएलच्या सहाव्या पर्वात आठव्या विजयाची नोंद करीत १६ गुणांसह चौथे स्थान टिकवले आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत शुक्रवारी बंगळुरूने दिल्लीचा फक्त चार धावांनी पराभव केला.
दिल्लीकडून उन्मुक्त चंद (४१) आणि बेन रोरर (३२) यांनी दमदार फलंदाजी केली. परंतु सामना निसटणार असे चित्र १८व्या षटकात स्पष्ट झाले, कारण दिल्लीला विजयासाठी १२ चेंडूंत ३४ धावा हव्या होत्या. परंतु इरफान पठाणने दोन षटकार ठोकून सामना आवाक्यात आणला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. मॉर्नी मॉर्केल आणि पठाण यांनी जयदेवच्या अखेरच्या षटकात जोरदार हल्ला चढवला. पण पाचव्या चेंडूवर मॉर्केल बाद झाला आणि दिल्लीला हादरा बसला.
कर्णधार विराट कोहली याचे तडाखेबाज शतक एके धावेने हुकले. मात्र त्याने ए बी डी’व्हिलीयर्सच्या साथीत केलेल्या ९४ धावांच्या भागीदारीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २० षटकांत ४ बाद १८३ धावा करता आल्या.
दिल्लीचे नेतृत्व करणारा डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्याचा हा निर्णय काहीसा सार्थ ठरला. त्यांच्यासाठी धोकादायक असलेला फलंदाज ख्रिस गेल याचा केवळ चार धावांवर त्रिफळा उडवत इरफान पठाण याने बंगळुरूला पहिला धक्का दिला. गेलच्या साथीला सलामीसाठी आलेल्या चेतेश्वर पुजाराने १७ चेंडूंत तीन चौकारांसह १७ धावा केल्या. मात्र सिद्धार्थ कौलने त्याचा त्रिफळा उडवत बंगळुरूला आणखी एक धक्का दिला.
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व मोझेस हेन्रिक्स यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी आत्मविश्वासाने फटके मारून धावांचा वेग वाढविला. संघाचे अर्धशतक ७.३ षटकांत पार केले. त्यांनी ८.३ षटकांत ८२ धावांची भागीदारी केली. शाहबाझ नदीमने हेन्रिक्सला २६ धावांवर बाद करीत ही जोडी फोडली. बंगळुरूच्या धावांचे शतक १५.१ षटकांत पूर्ण झाले. कोहलीने डी’व्हिलीयर्सच्या साथीतही शानदार भागीदारी केली. त्यांनी शेवटच्या चार षटकांत ७७ धावांची भर घातली. त्यामुळेच बंगळुरूला १८३ धावांपर्यंत मजल गाठता आली. कोहलीने शेवटच्या षटकांत उमेश यादव याच्या गोलंदाजीवर दोन षटकार व दोन चौकार मारले. शेवटच्या चेडूंवर शतक पूर्ण करताना तो ९९ धावांवर बाद झाला. ५८ चेंडूंमध्ये त्याने १० चौकार व चार षटकार अशी आतषबाजी केली. डी’व्हिलीयर्सने १७ चेंडूंमध्ये दोन चौकार व दोन षटकारांसह ३२ धावा केल्या. त्यांनी ६.४ षटकांत ९४ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद १८३ (विराट कोहली ९९, हेन्रिक्स मोझेस २६, ए बी डी’व्हिलीयर्स नाबाद ३२; शाहबाझ नदीम १/२३) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १७९ (उन्मुक्त चंद ४१, बेन रोरर ३२; जयदेव उनाडकट ५/२५)
सामनावीर : जयदेव उनाडकट.

Story img Loader