आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या हंगामातील ६० ते ७० टक्के सामने भारतात होतील, असे आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांनी देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर सांगितले. भारतात मोठय़ा प्रमाणात सामने आयोजित करण्याचा निर्णय बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीत घेण्यात आला. सिटी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला अध्यक्ष एन. श्रीनिवासन, वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव संजय पटेल, बिस्वाल, आयपीएल मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन उपस्थित होते.
आयपीएल ही स्थानिक स्पर्धा असल्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात भारतात व्हायला हवी, असे बिस्वाल यांनी सांगितले. आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर बिस्वाल म्हणाले की, ‘‘आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे भारतात मोठय़ा प्रमाणात सामने आयोजित करण्याचा आमचा कल आहे. ही इंडियन प्रीमियर लीग असल्यामुळे बरेचसे सामने देशात आयोजित करण्याची अवश्यकता आहे.’’
१६व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बुधवारी घोषित केल्या. ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत नऊ दिवस मतदानाचे असणार आहेत. ८१.४ कोटी मतदारांचा समावेश असलेल्या ५४३ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. तथापि, आयपीएलचा सातवा हंगाम ९ एप्रिल ते ३ जून या दरम्यान बहरणार आहे. या पाश्र्वभूमीवर मतमोजणीची प्रक्रिया संपल्यावर उर्वरित आयपीएल स्पर्धा भारतात हाऊ शकेल.
‘‘आयपीएल-७चे १६ मेनंतरचे सर्व सामने भारतात होतील. दक्षिण आफ्रिका या स्पध्रेचे संपूर्ण यजमानपद भूषवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आता विचार करता येणार नाही,’’ असे सूत्रांकडून समजते. संयुक्त अरब अमिराती (यूएई) व बांगलादेश हेसुद्धा आयपीएलच्या यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.
आयपीएलच्या सामन्यांसाठी परदेशी ठिकाण बुधवारच्या बैठकीत निश्चित होणार होते. परंतु आम्ही याबाबत निर्णय घेऊ शकलो नाही. हा निर्णय घेण्यासाठी आम्हाला आणखी दोन दिवस लागतील.
रणजिब बिस्वाल (आयपीएलचे प्रमुख)