‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वापासून म्हणजेच २००८ सालापासून ते अगदी परवाच्या सामन्यापर्यंत सलग १४३ आयपीएलचे सामने खेळण्याचा विक्रम करणारा सुरेश रैना पहिल्यांदाच ‘आयपीएल’ सामन्याला मुकणार आहे. सुरेश रैनाला काही दिवसांची सुटी हवी आहे. पण ही सुटी दुखापतीमुळे किंवा अन्य कुठल्या अडचणीसाठी नसून तो ‘बाबा’ होणार असल्याने त्याला काही दिवस सुटी घ्यावी लागणार आहे.

सुरेश रैनाची पत्नी प्रियांका चौधरी गर्भवती असून येत्या काही दिवसात तिची ‘डिलिव्हरी’ होणार आहे. ती सध्या हॉलंडमध्ये असून बाळंतपणाच्या काळात आपण प्रियांकासोबत असावे यासाठी तो हॉलंडला रवाना होणार आहे. त्यामुळे रैना पुढील तीन सामने खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत ‘गुजरात लायन्स’च्या नेतृत्त्वाची धुरा धडकेबाज फलंदाज ब्रेण्डन मॅक्क्युलम अथवा अरोन फिंचकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

सुरेश रैनाची ‘आयपीएल’मधील कामगिरी आजवर अव्वल दर्जाची राहिली आहे. गेली आठ वर्षे तो सातत्याने चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत होता, तर यंदाच्या पर्वात तो नवोदित ‘गुजरात लायन्स’ संघाची धुरा सांभाळतो आहे. गेल्या नऊ पर्वात तो आयपीएलच्या एकाही सामन्याला मुकला नव्हता. सलग १४३ सामने खेळलेल्या रैनाच्या खात्यात आजवर ३३.४८ च्या सरासरीने  ३,९८५ धावा असून ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.

Story img Loader