कोहलीचे स्पर्धेतील चौथे शतक; ८०० धावांचा नवा विक्रम; पंजाबपुढे २१२ धावांचे आव्हान
विराट कोहली हा असा एक अद्वितीय खेळाडू आहे की ज्याच्यावर कसलाही परीणाम होत नाही. प्रतिस्पध्र्याचा नाही, गोलंदाजांचा नाही पावसाची आणि ओल्या खेळपट्टीचीही नाही आणि दुखापतीची तर नाहीच नाही. सामन्यापूर्वी कोहलीच्या डाव्या बोटाला दुखापत झाली होती, पण त्याची तमा न बाळगता कोलहीने फटक्यांची अतिषबाजी करत स्पर्धेतील चौथे शतक झळकावले, त्याचबरोबर आयपीएलमध्ये एका हंगामात ८०० धावांचा विक्रमही त्याने रचला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याची दहा षटके वाया गेली असली त्यानंतर मैदानात कोहली बरसला. त्याच्या धावांच्या पावसात बंगळुरुचे चाहते चिंब भिजून गेले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे १५ षटकांत २११ धावांचा डोंगर रचला.
पावसामुळे या सामन्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पण वाऊस थांबल्यावर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करत सामना सुरु केला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाली होती तर मैदान निसरडे झाले होते. त्यामुळे नाणेफक जिंकत पंजाबने बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कमीत धावांमध्ये बंगळुरुला बाद करण्याचे स्वप्न पंजाबचा संघ बघत होता. पण त्यांच्या स्वप्नांना ख्रिस गेल आणि कोहली यांनी सुरुंग लावला.
कोहलीने पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करत आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसऱ्या बाजूने गेल संयतपणे फलंदाजी करत होता. कायले अ‍ॅबॉटच्या चौथ्या षटकात गेलने फटकेबाजीला सुरुवात केली आणि त्यानंतर या दोघांनीही पंजाबच्या गोलंदाजीची पिसे काढली. चेंडू आणि सीमारेषा यांच्या नात्याची वीण या दोघांनी घट्ट केली. कधी कोहली, तर कधी गेल पंजाबच्या गोलंदाजीवर तुटून पडत होते. पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूला मैदानाचा कोपरा दाखवला होता. मोठे फटके मारण्याच्या नादात गेल बाद झाला, पण त्याने फक्त ३२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ७३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर कोहलीच्या धावांचा ओघ आटला नाही, उलट त्याने दुपटीने पंजाबच्या गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. संदीप शर्माच्या चौदाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार वसूल करत त्याने स्पर्धेतील चौथे शतक झळकावले. पण याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. कोहलीने फक्त ५० चेंडूंत १२ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ११३ धावांची झंझावाती खेळी साकारली. यावेळी कोहलीने ९६ धावा या २० चेंडूंमध्ये फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर वसूल केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : १५ षटकांत ३ बाद २११ (विराट कोहली ११३, ख्रिस गेल ७३; संदीप शर्मा १/२९) वि. किंग्ज इलेव्हन पंजाब. (धावपलक अपूर्ण)

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : १५ षटकांत ३ बाद २११ (विराट कोहली ११३, ख्रिस गेल ७३; संदीप शर्मा १/२९) वि. किंग्ज इलेव्हन पंजाब. (धावपलक अपूर्ण)