दुध पिताना तोंड भाजलं की माणूस ताकही फुंकून पितो असं म्हणतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात गाजलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उप-कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बँकरॉफ्ट यांना दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडून तात्काळ मायदेशी बोलावून घेण्यात आलं आहे, लवकरच त्यांच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात येईल. मात्र या प्रकरणानंतर, आगामी आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या भवितव्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अकराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ, स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन पुनरागमन करत आहेत. मात्र स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन्ही संघाच्या अब्रुची लक्तरं ज्या प्रकारे वेशीवर टांगली गेली आहेत, ती पाहता बॉल टॅम्परिंग प्रकरणी दोन्ही संघांना ताक फुंकून पिणं गरजेचं झालं आहे.
क्रिकेटला भारतात लोकं एका धर्माप्रमाणे वागणूक देतात. दहा वर्षांपूर्वी आलेल्या आयपीएलने भारतीय क्रिकेटची व्याख्या पूर्णपणे बदलवून टाकली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांना रोडावलेली प्रेक्षकसंख्या, आयपीएलच्या सामन्यांमुळे पुन्हा एकदा मैदानाकडे खेचली गेली. झटपट होणारे टी-२० सामने, बॉलिवूडचं ग्लॅमर आणि चिअरलिडर्सचा जलवा यासारख्या गोष्टींमुळे टेलिव्हीजनवरही आयपीएलने टीआरपीचे नवे उच्चांक निर्माण केले. मात्र २०१३ साली झालेल्या स्पॉट फिक्सींग प्रकरणाने पहिल्यांदा भारतीय चाहत्यांच्या विश्वासाला मोठा तडा बसला. ज्या खेळावर भारतीय चाहते मनापासून प्रेम करतात, त्या खेळामध्ये कोणीही बेईमानी केलेली त्यांना सहन होत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर श्रीशांतची क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची धडपड पहा. न्यायालयाने सुटका केल्यानंतरही भारतीय चाहत्यांनी श्रीशांतला माफ केलेलं नाही. अशावेळी सामना जिंकण्यासाठीची रणनिती म्हणून बॉल टॅम्परिंग करणाऱ्या खेळाडूंना भारतीय चाहते स्विकारतील का? हा मोठा प्रश्नच आहे.
बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय?
क्रिकेट सामन्यांमध्ये चेंडूवर आपली पकड मजबूत करण्यासाठी एखाद्या उपकरणाने चेंडूच्या शिवणीसोबत छेडछाड करणे किंवा ती कुरतडणे म्हणजे बॉल टॅम्परिंग. चेंडू अधिक स्विंग होण्यासाठी साधारणपणे गोलंदाज असे प्रकार करतो. चेंडूवर नखाने किंवा टोकदार वस्तूने ओरखडे पाडणे, च्युईंग गम किंवा जेलीबीन घासणे, चिकटपट्टी लावणे यासारख्या कृती बॉल टॅम्परिंग प्रकरणात मोडल्या जातात.
स्टिव्ह स्मिथ आणि कंपनीने केलेलं बॉल टॅम्परिंग समोर आल्यानंतर, अनेकांनी टॅम्परिंग हा काही मोठा गुन्हा नसल्याचं म्हटलं आहे. अनेक ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूंनी स्मिथची चूक फार मोठी नसल्याचं सांगत त्याला माफ करण्याचं आवाहन केलंय. दुर्दैवाने आयसीसीचे नियम या प्रकणात अगदीच तकलादू असल्यामुळे या प्रकारांवर आळा बसत नाही. मानधनातली रक्कम कापली जाणे किंवा काही सामन्यांसाठी होणारं निलंबन, यापलीकडे खेळाडूंना बॉल टॅम्परिंग प्रकरणात शिक्षा झाल्याचं ऐकिवात नाही. सध्या स्मिथ-वॉर्नर-बँकरॉफ्ट त्रिकुटावर आजीवन बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे, मात्र आयसीसीचे सध्याचे नियम पाहता याप्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा होण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जातंय.
आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॉल टॅम्परिंग करताना रंगेहात पकडले गेले. यानंतर टेलिव्हीजन कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या दृष्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन आपल्या खेळाडूंना वॉकीटॉकीवरुन काही सूचना देताना आढळले होते. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने, घडलेला प्रकार मान्य करत बॉल टॅम्परिंग करणं हा संघाच्या रणनितीचा भाग होता हे मान्य केलं. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणींमध्ये वाढ होत गेली, आणि त्याचा परिणाम म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाला आपल्या कर्णधार-उप कर्णधाराला माघारी बोलवावं लागलं. या घटनेनंततर ऑस्ट्रेलियन संघाला मिळणारं प्रायोजकत्वावरही गंडातंर आलं असून अनेक मुख्य कंपन्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी असणारे संबंध तोडण्याची भूमिका घेतली आहे. कोणत्याही खेळात तुम्ही केलेली एक वाईट गोष्ट, तुमची कारकिर्द बिघडवण्यासाठी पुरेशी ठरु शकते. ज्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अडकले आहेत, ते पाहता यापुढच्या काळात त्यांच्या प्रत्येक घडामोडींकडे आता संशयाच्या नजरेतून पाहिलं जाईल.
क्रिकेटला खरंतरं Gentelmens Game असं ओळखलं जातं. मात्र नव्वदीच्या दशकात क्रिकेटला फिक्सींगची किड लागली. अनेक महत्वाच्या संघाचे खेळाडू यात अडकले गेले. बीसीसीआयलाही मध्यंतरीच्या काळात या फिक्सींग प्रकरणात मोठी बदनामी सहन करावी लागली. अनेक महत्वाच्या खेळाडूंची कारकिर्द फिक्सींग प्रकरणामुळे मोक्याच्या क्षणी खुंटली. यानंतर क्रिकेटला लागलेली भ्रष्टाचाराची किड उपटण्यासाठी आयसीसी व बीसीसीआयने कायद्यांमध्ये सुधारणा केली. मात्र २०१३ साली गाजलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणामुळे जुनी मढी पुन्हा उकरली गेली. भारताच्या अजित चंडेला, अंकित चव्हाण आणि श्रीशांत या खेळाडूंना या प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ या प्रकरणात दोषी आढळले गेले. मात्र दोन वर्षांच्या बंदीपलीकडे त्यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई झाली नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. काळाच्या ओघात भारतीय क्रिडा चाहते स्पॉट फिक्सींगचं प्रकरण विसरलेही असतील. मात्र दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आलेल्या संघाची आता मोठी अग्नीपरीक्षा आहे. बॉल टॅम्परिंग हे प्रकरण वरुन जरी साधं वाटत असलं तरीही हे एका प्रकारे मॅच फिक्सींगच झालं. आता यावरुन अनेकांमध्ये मत-मतांतर असू शकतात. मात्र जी गोष्ट चूक ती चूकचं, त्या चूकीचं कोणत्याही प्रकारे समर्थन करणं योग्य ठरणार नाही. राजस्थानने स्टिव्ह स्मिथबद्दल निर्णय घेतला आहे, मात्र सनराईजर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरबद्दल अजुनही आस्ते कदम भूमिका घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड या खेळाडूंच्या शिक्षेबद्दल जो काही निर्णय घेईल तो घेईल, मात्र बॉल टॅम्परिंग करुन संघाच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये संघात स्थान देऊन, संघमालकांनी पुन्हा एकदा आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेऊ नये म्हणजे मिळवलं.
– प्रथमेश दीक्षित
prathmesh.dixit@indianexpress.com