आयपीएलच्या आगामी हंगामात दमदार पुनरागमन करण्याच्या हेतूने चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जाडेजा यांना संघात कायम राखल्यानंतर चेन्नई संघ व्यवस्थापनाने स्टिफन फ्लेमिंग यांना संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा परत आणलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचे विशेष कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी ही माहिती दिली.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळाडू म्हणून सहभागी होते. यानंतर पुढच्या हंगामात फ्लेमिंग यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारणं पसंत केलं. फ्लेमिंग यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २०१० आणि २०११ या सालांमध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जने ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकल हसी याला फलंदाजी प्रशिक्षक तर लक्ष्मीपती बालाजी याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेलं आहे.

२७ -२८ जानेवारी रोजी आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा हा पहिलाच आयपीएलचा हंगाम असणार आहे. त्यामुळे फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईचा संघ कोणते खेळाडू आपल्या ताफ्यात जमा करतो हे पहावं लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.