कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने आगामी अकराव्या हंगामात नवीन संघाकडून खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत गौतमने ही माहिती दिली आहे. याबद्दल गौतम गंभीरने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, मात्र आगामी हंगामात आपल्याला अन्य संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्यास आपण त्याचा जरुर विचार करु असं गौतमने म्हटलंय.
आतापर्यंत माझ्या कर्णधारपदाच्या काळात कोलकाता नाईट रायडर्सने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे खराब फॉर्म सुरु असताना संघ सोडण्याऐवजी चांगली कामगिरी करत असताना नवीन संधी स्विकारणं मी पसंत करेन. अजुन मी निर्णयावर ठाम झालेलो नसलो तरीही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यानंतर मी यावर आवर्जून विचार करेन, असंही गौतम म्हणाला. एक खेळाडू म्हणून, आगामी काळात जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याकडे माझा कल असल्याचंही गौतमने स्पष्ट केलं आहे.
पहिले ३ हंगाम सुमार कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने चौथ्या हंगामात गौतम गंभीरला कर्णधारपदी नियुक्त केलं. यानंतर गंभीरच्या नेतृत्वाखाली नाईट रायडर्स संघ व्यवस्थापनाने सर्वोत्तम संघ उभा करुन दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं. गौतमने आतापर्यंत ७ हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावामध्ये प्रत्येक संघमालकाला ५ खेळाडूंना कायम राखण्याची मूभा मिळालेली आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव, नवीन वर्षात २७ आणि २८ जानेवारी रोजी बंगळुरुत पार पडणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर अकराव्या हंगामात कोणत्या संघाकडून खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.