आयपीएलच्या अकराव्या हंगामात गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सची साथ सोडल्यानंतर, संघाचं नेतृत्व कोण करणार असा सवाल निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी रॉबिन उथप्पाने आपण कर्णधारपदासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. यानंतर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ख्रिस लिनने कर्णधारपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. मागच्या हंगामात ख्रिस लिन कोलकात्याच्या फलंदाजीचा कणा होता. महत्वाची गोष्ट म्हणजे कोलकात्याचा प्रशिक्षक जॅक कॅलिजने लिन संघाचा कर्णधार बनू शकतो असे संकेत दिले आहेत.
एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ख्रिस लिननेही आपण कर्णधारपद भूषवण्यात उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. “कोलकाता नाईट रायडर्स संघाची सर्व प्रशिक्षकांनी एक चांगल्या पद्धतीने मोट बांधली आहे. माझ्याव्यतिरीक्त अन्य काही खेळाडूंनीही दहाव्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे कर्णधारपदाची शर्यत सोपी नसेल यात काही वाद नाही. पण मला संधी मिळाल्यास मी नक्कीच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेन.”
कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही आपल्या चाहत्यांना कर्णधारपदासाठी ३ पर्याय देत, त्यांचीही मत विचारली होती.
We received close to half a million suggestions for #KnightsOf2018.
Thank you #KnightRiders for your participation! #KorboLorboJeetbo pic.twitter.com/BLANWv419v— KolkataKnightRiders (@KKRiders) February 17, 2018
त्यामुळे नवीन हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची कमान कोणत्या खेळाडूकडे जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.