न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू मिचेल मॅक्लेनघन याची आयपीएलमध्ये घरवापसी झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फच्या जागेवर मॅक्लेनघनची वर्णी लागलेली आहे. अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात बेहनडॉर्फवर मुंबई इंडियन्सने १.५ कोटींची बोली लावली होती. मात्र पाठीला झालेल्या दुखापतीनंतर बेहरनडॉर्फने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. या जागेवर मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा मॅक्लेनघनला संधी देण्याचं ठरवलं आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे २७-२८ जानेवारी रोजी बंगळुरुत पार पडलेल्या लिलावात मॅक्लेनघनवर मुंबई इंडियन्ससह कोणत्याही संघमालकाने बोली लावलेली नव्हती. २०१५-१७ या ३ वर्षांच्या काळात मॅक्लेनघनने मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या काळात ४० सामन्यांमध्ये मॅक्लेनघनच्या नावावर ५४ बळी जमा आहेत.

अवश्य वाचा – मोहम्मद शमीचा आयपीएल सहभाग निश्चित; बीसीसीआयने दिली क्लिन चीट

२०१६ सालापासून मॅक्लेनघनला न्यूझीलंडच्या संघातही जागा मिळत नाहीये. त्यामुळे आयपीएलच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची मोठी संधी मॅक्लेनघनच्यासमोर आलेली आहे. न्यूझीलंडकडून आतापर्यंत मिचेल मॅक्लेनघनने २८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात मॅक्लेनघनच्या नावावर ३० बळी जमा आहेत. याचसोबत न्यूझीलंडकडून ४८ वन-डे सामने खेळणाऱ्या मिचेलने ८२ बळी घेतले आहेत. त्यामुळे या हंगामात मॅक्लेनघनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.