ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ आयपीएलमध्ये पृथ्वी शॉच्या खेळीने चांगलाच प्रभावित झाला आहे. मुळचा मुंबईकर असलेला पृथ्वी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळतो आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने आक्रमक फटकेबाजी करत आपल्या फलंदाजीतली चुणूक दाखवून दिली. पृथ्वी शॉच्या या खेळीत वॉला सचिनचा भास झाला. स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना मार्क वॉने पृथ्वीच्या खेळाचं कौतुक केलं.

“पृथ्वी शॉ मैदानात असताना सर्वात पहिली गोष्ट नजरेत येते ती म्हणजे त्याची शैली, मला त्याच्या शैलीत सचिन तेंडुलकरचा भास होतो. बॅटनप ग्रिप, खेळपट्टीवर फलंदाजीदरम्यान उभं राहण्याची शैली, प्रत्येक फटका खेळताना पायांची हालचाल या सर्व गोष्टी सचिनच्या शैलीशी जुळणाऱ्या आहेत. आगामी काळात पृथ्वीने आपली ही शैली कायम राखली तर जगातल्या कोणत्याही गोलंदाजाला तो सहज खेळू शकतो”, मार्क वॉ बोलत होता.

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये पृथ्वी शॉने १४० धावा काढल्या आहेत. १८ वर्षांच्या पृथ्वी शॉने आपलं पहिलं आयपीएल खेळताना अर्धशतकी खेळी करुन, आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे मार्क वॉ सारख्या फलंदाजाने पृथ्वी शॉचं कौतुक केल्यामुळे आगामी काळात पृथ्वीच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader