दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर, राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी जय्यत तयारी केल्याचं दिसतंय. आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने मुंबईचा माजी रणजीपटू अमोल मुझुमदारला फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राजस्थान संघ व्यवस्थापनाने या नेमणुकीची घोषणा केली आहे.
A Royal welcome to @amolmuzumdar11, our new batting coach!
With a stellar domestic career, this record breaking first-class debutant has a lot to pass on to the #RoyalSquad!https://t.co/aFKXZpybdn
Welcome to the family!#HallaBol #Cricket #IPL2018 pic.twitter.com/tVmEp6qujL
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 13, 2018
रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारच्या पदरी दांडगा अनुभव आहे. १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमघ्ये अमोलने ११ हजार १६७ धावा केल्या आहेत. आपल्या काळात अमोल तंत्रशुद्ध फलंदाजी आणि ‘खडुस’ खेळीसाठी ओळखला जायचा. संघातील तरुण फलंदाजांना अमोलच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या हंगामात नवीन सुरुवात करताना आम्ही अमोलवर मोठी जबाबदारी सोपवल्याचं, राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं.
आजपासून राजस्थान रॉयल्स, आपल्या खेळाडूंसाठी जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर सराव शिबीर सुरु करणार आहे. या शिबीरात अमोल राजस्थानच्या युवा फलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे. काळानुरुप क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. सध्याची तरुण पिढी हे नवीन बदल अतिशय वेगाने आत्मसात करत आहे, त्यामुळे त्यांच्या जोडीने काम करताना आपल्यालाही अनेक गोष्टी शिकायला मिळणार असल्याचं अमोल मुझुमदार म्हणाला.