आयपीएलच्या पहिल्या पर्वाचा विजयी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू शेन वॉर्नचं अकराव्या हंगामात आयपीएलमध्ये पुनरागमन झालेलं आहे. अकराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने वॉर्नला मार्गदर्शक म्हणून आपल्या संघात घेतलं आहे. २००८-२०११ पर्यंत शेन वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायला. यानंतर तब्बल ७ वर्षांनी शेन वॉर्नचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन राजस्थान रॉयल्सने ही घोषणा केली आहे.
Very excited to be joining the @rajasthanroyals in this years #IPL as team mentor ! https://t.co/WdrzDAIDZl
— Shane Warne (@ShaneWarne) February 13, 2018
३ वर्ष आयपीएल सामन्यांमध्ये शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्स संघाकडून ५२ सामने खेळले आहेत. या सामन्यात शेन वॉर्नच्या नावावर ५६ बळी जमा आहेत. राजस्थान रॉयल्सचं माझ्या आयुष्यात नेहमी महत्वाचं स्थान राहिलेलं आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने दिलेली ऑफर मी लगेच स्विकारल्याचं शेन वॉर्नने म्हणलं आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालेलं आहे. त्यामुळे नवीन आणि अनुभवी खेळाडूंची मोट बांधण्यासाठी शेन वॉर्नसारख्या खेळाडूची संघाला गरज होती, यानुसार शेन वॉर्नला संघात मार्गदर्शक म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं असल्याचं राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेन वॉर्नच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ या स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.