दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणात टीकेचा धनी बनलेल्या स्टिव्ह स्मिथने, राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या, Cricket Operations विभागाचे प्रमुख झुबीन बरुचा यांनी स्मिथच्या पायउतार होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्मिथच्या अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.

अवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग : स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी ?

काल दिवसभर गाजत असलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात आयसीसीने स्टिव्ह स्मिथवर कारवाई केली. स्मिथच्या मानधनातली १०० टक्के रक्कम कापून घेण्यात आली असून त्याच्यावर एका कसोटी सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. यानंतर राजस्थान रॉयल्सही स्मिथवर कारवाई करणार अशी माहिती समोर येत होती. मात्र त्याआधीच स्मिथने स्वतःहून कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

अजिंक्य रहाणे हा संघाचा अविभाज्य हिस्सा आहे. त्यामुळे स्टिव्हच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करण्यासाठी आमच्यासमोर अजिंक्य रहाणे हा एकमेव पर्याय असल्याचं राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने मान्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केल्याचं समोर आलं होतं. यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत, चेंडूशी छेडछाड करणं हा आमच्या रणनितीचा एक भाग होता असं म्हणत आपली चूक मान्य केली. यानंतर आयसीसीने स्मिथवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Story img Loader