आयपीएलच्या ११ व्या हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब यासंघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्त झालेल्या व्यंटेश प्रसाद यांनी पंजाबच्या संघमालकांनी, व्यवस्थापन मंडळाने आणि खेळाडूंनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या पदावर नियुक्त होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच प्रसाद यांनी १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.
पंजाबच्या संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर प्रसाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. ‘संघाच्या प्रशिक्षकपदी माझी निवड होणं ही फारच आनंदाची गोष्ट आहे. मुळात संपूर्ण संघाने माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे मी त्यांचा फार आभारी आहे. मला आशा आहे की त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकेन आणि यंदाच्या हंगामात संघाला यश मिळवून देण्यात माझा हातभार लागेल’, असे प्रसाद म्हणाले.
पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग
प्रसाद यांच्याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉज पुढील तीन वर्षांसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. त्याशिवाय विरेंद्र सेहवाग या संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे. तेव्हा आता माजी खेळाडूंच्या साथीने किंग्ज इलेव्हनचा संघ यंदाच्या आयपीएलच्या हंगामात कोणता पल्ला गाठतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.