शनिवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याचा निकाल सुपरओव्हर मध्ये लागला. बाराव्या हंगामातला सुपरओव्हरवर निकाल लागलेला हा पहिला सामना ठरला. पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या आघाडीच्या फळीला झटपट माघारी धाडलं. मात्र यानंतर, दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाला 185 धावांचा पल्ला गाठून दिला. या खेळीदरम्यान आंद्रे रसेलने विरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत दोन ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
आंद्रे रसेलने दिल्लीविरुद्ध 28 चेंडूत 62 धावांची खेळी केली. रसेलचं आयपीएलमधलं हे पाचवं अर्धशतक ठरलं. याचसोबत रसेलने आयपीएलमध्ये 1 हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला. आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंचा वापर करुन 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. रसेलने केवळ 545 चेंडूमध्ये हजार धावा पूर्ण केल्या.
अवश्य वाचा – IPL 2019 : एका धावाने पृथ्वीचं शतक हुकलं आणि विक्रमाची सुवर्णसंधीही
रसेलने आयपीएलमध्ये केलेल्या 1 हजार धावा या 183.69 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात रसेलचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक ठरला आहे. विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, ऋषभ पंत यासारख्या स्फोटक फलंदाजांना रसेलने मागे टाकलं आहे.
अवश्य वाचा – Video : ऋषभ पंतचा हा भन्नाट झेल पाहिलात का??