किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात, पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विनने जॉस बटलरला ‘मंकड’ पद्धतीने धावबाद करत, एका नवीन वादाला तोंड फोडलं. या घटनेनंतर अनेक माजी खेळाडूंनी आश्विनच्या वागण्याला चुकीचं ठरवलं. तर अनेक भारतीय माजी खेळाडूंनी आश्विनच्या वागण्याचं समर्थनही केलं. यावेळी भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडनेही आश्विनच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. तो ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“आश्विनने केलेली कृती ही नियमाला धरुन होती ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे कोण काय मत देतं हे महत्वाचं नाही. आश्विनने केलेली ती कृती ही योग्यच होती. या प्रकरणानंतर आलेल्या काही प्रतिक्रीया या अवास्तव होत्या. आश्विनला नैतिकतेवरुन टीका करणं योग्य नाही. ‘त्या’ घटनेवर आश्विनचंही काही मत असेलच, ते तुम्हाला पटलं नाही तरी चालेल पण त्याने केलेली कृती ही नियमाला धरुनच होती. त्याच्या या कृतीमुळे आपण त्याला खलनायक बनवू शकत नाही. माझ्या मते आश्विनने बटलरला याबद्दल सुचना द्यायला हवी होती. पण त्याला असं करावसं वाटलं नाही, तरीही त्याबद्दल कोणालाच आक्षेप असण्याचं कारण नाही. आश्विनने कोणाचीही फसवणूक केली नाही, त्याची कृती ही नियमांना धरुनच होती.” राहुल द्रविडने आपली भूमिका मांडली.

रविचंद्रन आश्विननेही पहिल्या सामन्यानंतर आपल्या वागणुकीचं समर्थन केलं होतं. राजस्थानवर मात करुन पंजाबने आपल्या हंगामाची सुरुवात विजयाने केली होती. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये त्याची पंजाब आणि आश्विनची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Story img Loader