आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने यंदा सामाजिक भान राखत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघ यंदाच्या हंगामातल्या पहिल्या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबीयांना देणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वतः हा धनादेश शहीद जवानांच्या कुटुंबांना देणार आहे.

पहिल्या सामन्यातील तिकीटविक्रीतून मिळणारी रक्कम यंदा पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाईल. लष्कराकडून मानाची लेफ्टनंट जनरल ही पदवी मिळालेला धोनी ही मदत कुटुंबांना देईल, अशी माहिती चेन्नईच्या संघाचे संचालक राकेश सिंह यांनी दिली.

बाराव्या हंगामातील आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. चेन्नईच्या संघाने दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून गतवर्षीच्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ हंगामाची सुरुवात कशी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader