फिरकीपटूंनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स संघावर एकतर्फी मात केली आहे. चेन्नईने दिल्लीवर ८० धावांनी मात करत गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आला आहे. १८० धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. चेन्नईच्या फिरकीपटूंनी दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्यातही अपयशी ठरला. अवघ्या ४ धावा काढून तो माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शिखर धवनचा त्रिफळा उडवत हरभजनने दिल्लीला दुसरा धक्का दिला. यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकामोगामाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिल्लीचा संघ ९९ धावांपर्यंत मजल मारु शकला.
कर्णधार श्रेयस अय्यरने एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ४४ धावांवर तो देखील रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. दिल्लीकडून फिरकीपटू इम्रान ताहीरने ४ तर रविंद्र जाडेजाने ३ बळी घेतले. त्यांना दिपक चहर, ड्वेन ब्राव्हो यांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.
त्याआधी, सुरेश रैनाचं अर्धशतक आणि त्याला फाफ डु प्लेसिस व मधल्या फळीतल्या फलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर १७९ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी धोनीने आपण फलंदाजी करण्याच्या विचारानेच मैदानात उतरल्याचं मान्य केलं. मात्र त्याच्या फलंदाजांना हा विश्वास सार्थ ठरवता आली नाही. सुरुवातीच्या षटकांपासून दिल्लीच्या गोलंदाजांनी चेन्नईवर अंकुश ठेवला. शेन वॉटसन भोपळाही न फोडता जगदीश सुचितच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
यानंतर सुरेश रैना आणि फाफ डु प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. मात्र या दोन्ही फलंदाजांना आश्वासक गतीने धावा वाढवता आल्या नाहीत. अक्षर पटेलने डु प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला दुसरा धक्का दिला. यानंतर सुरेश रैनाची अर्धशतक झळकावून माघारी परतला.
यानंतर महेंद्रसिंह धोनी, अक्षर पटेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला १७९ धावांचा टप्पा गाठून दिला. दिल्लीच्या गोलंदाजांनी आज आश्वासक कामगिरी केली. जगदीश सुचितने २ तर ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल जोडीने प्रत्येकी १-१ फलंदाजाला माघारी धाडलं.
अमित मिश्रा ताहीरच्या गोलंदाजीवर माघारी
चेन्नई विजयापासून एक पाऊल दूर
चेन्नईची विजयाच्या दिशेने वाटचाल
रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने मॉरिसला केलं यष्टीचीत
इम्रान ताहीरला मिळाला आणखी एक बळी
इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल माघारी
रविंद्र जाडेजाने घेतला बळी
इम्रान ताहीरने घेतला बळी
हरभजन सिंहने उडवला त्रिफळा
दिपक चहरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने घेतला झेल
अखेरच्या षटकात धोनीची फटकेबाजी
ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना जाडेजा बाद
जगदीश सुचितच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना शिखर धवनने घेतला रैनाचा झेल
चेन्नईने ओलांडला शंभर धावांचा टप्पा
फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर माघारी
त्याआधी डु प्लेसिस आणि रैनामध्ये दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी
जगदीश सुचितच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर अक्षर पटेलने घेतला वॉटसनचा झेल
गुणतालिकेतील अग्रस्थानी दोन्ही संघांचे लक्ष्य
धोनीचं चेन्नईच्या संघात पुनरागमन