IPL 2019 : या स्पर्धेत मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज (शुक्रवारी) होणाऱ्या सामन्यात दिल्ली आणि चेन्नई यांच्यापैकी जो संघ विजयी ठरेल, तो मुंबईशी अंतिम सामना खेळणार आहे. मुंबईसोबत झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात चेन्नईला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. चांगली फलंदाजांची फौज असूनही चेन्नईला केवळ १३३ धावत करता आला होत्या. गोलंदाजीतही चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. याउलट दिल्लीने मात्र अटीतटीच्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला.
चेन्नईने सामना जिंकावा असे वाटणारे अनेक चाहते आहेत. त्यातच विंडीजने महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनीही चेन्नईच्या संघाने सामना जिंकावा यासाठी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या UEFA फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनापुढे तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या लिव्हरपूर संघाने बार्सिलोनाला पराभवाची चव चाखायला भाग पाडले. पहिल्या फेरीत (फर्स्ट लेग) बार्सिलोनाने लिव्हरपूलला ३-० असे पराभूत केले होते. पण दुसऱ्या फेरीत (सेकन्ड लेग) लिव्हरपूलने दमदार पुनरागमन केले आणि बार्सिलोनाला ४-० असे पराभूत करत थेट स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. लिव्हरपूलने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, तसे दमदार पुनरागमन चेन्नईने करायला हवे, असा सल्ला रिचर्ड्स यांनी दिला आहे. तसेच बाद फेरीचे सामने हे एकट्या दुकट्याच्या बळावर नव्हे, तर सांघिक कामगिरीच्या बळावर जिंकले जातात, असेही त्यांनी सांगितले.
या उलट दुसरीकडे उत्साहाने परिपूर्ण असेलला दिल्लीचा संघ २०१२ सालानंतर प्रथमच प्ले ऑफ्स गटात पोहोचला आहे. याबाबत योगायोग म्हणजे २०१२ साली क्वालिफायर २ या सामन्यात दिल्लीच्या संघापुढे चेन्नईचेच आव्हान होते. पण त्या सामन्यात चेन्नईकडून दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना मुरली विजयच्या (११३) शतकाच्या जोरावर चेन्नईने २२२ धावा ठोकल्या होत्या. तर दिल्लीला प्रत्युत्तरात केवळ १३६ धावत करता आल्या होत्या. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी स्पर्धेच्या अगदी समान टप्प्यावर दिल्लीला चेन्नईकडून झालेल्या ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी आहे.
याचबरोबर, आजच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत या दोघांच्या कामगिरीवर सर्व क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईने दोनही वेळा दिल्लीवर विजय मिळवला होता, त्यामुळे या हंगामातील पराभवाचा वचपा काढण्याचीही संधी दिल्लीकडे आहे.