IPL 2019 CSK vs MI : स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने सामने आलेल्या मुंबई – चेन्नई लढतीत मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवले आणि चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बरोबरच जे कोणालाही जमलं नाही, ते मुंबईच्या संघानं करून दाखवलं. यंदाच्या हंगामात चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई पहिला संघ ठरला. या स्पर्धेत चेन्नईने एकूण ६ सामने घरच्या मैदानावर खेळले. त्यात ५ सामने चेन्नईने जिंकले पण शुक्रवारच्या सामन्यात चेन्नईला पराभूत व्हावे लागले. याशिवाय मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण २६ सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने १५ सामने जिंकले आहेत, तर ११ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने ४-२ अशी आघाडी राखली आहे.

दरम्यान, मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने त्याला चतुर गोलंदाजी करत माघारी धाडले. धोनीच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेला कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला. प्रतिभावान फलंदाज अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. तो ३ चेंडू खेळला पण त्याला भोपळाही फोडता आला नाही. केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने ६ धावा केल्या. नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.

एकीकडे गडी झटपट बाद होताना एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या. मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो झेलबाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ब्राव्हो २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोणीही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर स्थिरावला नाही.

त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईला मोठी झेप घेता आली नाही. मुंबईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र क्विंटन डी-कॉक लवकर माघारी परतला. यानंतर एविन लुईसच्या साथीने रोहितने मुंबईचा डाव सावरला. रोहितने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या एविन लुईसने ३२ धावा केल्या. मात्र लुईस माघारी परतल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. आवश्यक धावगतीने खेळणं मुंबईच्या फलंदाजांना जमलं नाही.

मधल्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी मुंबईला १५५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून मिचेल सँटनरने २, तर दिपक चहर आणि इम्रान ताहीरने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 csk vs mi mumbai indians become 1st team to beat chennai super kings in their home game