चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाने पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या इतिहासात 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सुरेश रैना पहिला फलंदाज ठरला आहे. बंगळुरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रैनाने या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

पहिल्या सामन्यात फलंदाजीला येईपर्यंत रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 4985 धावा जमा होत्या. 5 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या 15 धावा काढत रैनाने इतिहासाची नोंद केली.

या सामन्यात विराट कोहलीलाही हा विक्रम करण्याची संधी होती. मात्र यासाठी आवश्यक असलेल्या 52 धावा काढणं त्याला जमलं नाही. पहिल्या सामन्याआधी कोहलीच्या खात्यात आयपीएलमध्ये 4948 धावा होत्या. मात्र पहिल्या सामन्यात विराट केवळ 6 धावाच काढू शकला. त्यामुळे आगामी सामन्यात विराट ही कामगिरी करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, हरभजन सिंह, इम्रान ताहीर आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंच्या जोरावर पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला 70 धावांमध्ये रोखण्यात चेन्नईचा संघ यशस्वी झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पार्थिव पटेलचा अपवाद वगळता बंगळुरुचे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. पहिल्याच सामन्यात चेन्नईचा संघ बंगळुरुला 70 धावात रोखण्यामध्ये यशस्वी झाला.

Story img Loader