इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुभवी खेळाडूंच्या चेन्नई सुपर किंग्जशी आज सामना

विशाखापट्टणम् : नवे नाव आणि नव्याने संघबांधणी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये कात टाकली आहे. स्पर्धेच्या १२व्या अध्यायात प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी शुक्रवारी त्यांना बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जचा अडथळा दूर करावा लागणार आहे.

‘आयपीएल’ गुणतालिकेत दिल्लीला अव्वल दोन स्थानांपासून रोखण्याची किमया चेन्नईनेच दाखवली. चेपॉकवर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने ८० धावांनी दारुण पराभव केल्यामुळे दिल्लीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. उभय संघांमधील यंदाच्या हंगामातील पहिला सामनासुद्धा चेन्नईनेच सहा गडी राखून जिंकला आहे. त्यामुळेच ‘क्वालिफायर-२’ सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

बुधवारी झालेल्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात दिल्लीने हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवला. याच मैदानावर एक सामना खेळण्याचा अनुभव दिल्लीसाठी उपयुक्त ठरेल. परंतु तीन विजेतेपदे आणि चार उपविजेतेपदांचा अनुभव असणाऱ्या चेन्नईने आठव्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार केला आहे. चेन्नईसारखी फिरकीला अनुकूल खेळपट्टी नसल्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा इम्रान ताहीर आणि हरभजन सिंग यांच्यासारख्या फिरकीवीरांचा सामना करणे आव्हानात्मक ठरले असते.

पंतवर दिल्लीची भिस्त

ऋषभ पंतने आत्मविश्वास उंचावणारी २१ चेंडूंत ४९ धावांची वेगवान खेळी साकारली. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळलेल्या पंतचे समाजमाध्यमांवर मोठे कौतुक होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही पंतला स्थान न देणाऱ्या निवड समितीवर टीका केली आहे. धावांचा पाठलाग करताना पंतच्या खेळीमुळे सामन्याचे चित्र पालटले. परंतु संघ विजयासमीप असताना तो बाद झाला. त्यामुळे विजयवीर होण्याची क्षमता नसल्याची टीकासुद्धा पंतला सहन करावी लागत आहे. परंतु चेन्नईविरुद्ध तो सामना जिंकून देणारी खेळी साकारून टीकाकारांना चोख उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. याचप्रमाणे आधीच्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ याला सूर गवसला असून, त्याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी उभारली. कॅगिसो रबाडाच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून वेगवान मारा केला. कीमो पॉलनेही जबाबदारीने मारा करीत तीन बळी घेतले. अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने मार्टिन गप्टिलचा अडसर दूर केला.

संघ : चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलिन.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, किमो पॉल, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, इशांत शर्मा, हनुमा विहारी, अंकुश बेन्स, जगदीश सुचित, मनजोत कालरा, ख्रिस मॉरिस, शेरफाने रुदरफोर्ड, जलाज सक्सेना, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नथ्थू सिंग, बंडारू अयप्पा, कॉलिन मुन्रो.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

१४ चेन्नई आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत २० सामने झाले असून, यापैकी १४ सामने चेन्नईने आणि ६ सामने दिल्लीने जिंकले आहेत.

धोनी, वॉटसनकडून अपेक्षा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या धोनीकडून दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अधिक सक्षम खेळीची अपेक्षा आहे. सलामीवीर शेन वॉटसनने २३ एप्रिलला हैदराबादविरुद्ध ५३ चेंडूंत ९६ धावा केल्या होत्या. परंतु त्यानंतर वॉटसन आपला आविष्कार दाखवू शकलेला नाही. मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई कर्णधार धोनीने म्हटले होते की, ‘‘खेळपट्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत फलंदाजांनी खेळणे आवश्यक होते. तसेच आमच्या फलंदाजांनी फटके लगावण्यासाठी चुकीच्या चेंडूंची निवड केली.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 delhi capitals vs chennai super kings match preview
Show comments